सांगली : आमची लायकी कधीच सिद्ध झालीय : संजयकाका पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:33 PM2018-09-15T15:33:52+5:302018-09-15T15:36:20+5:30
आमची व अन्य भाजप नेत्यांची लायकी जनतेने कधीच मतदानातून सिद्ध केली आहे. भविष्यातील निवडणुकीतही ती सिद्ध होईल. त्यामुळे गोपिचंद पडळकर यांनी केलेले आरोप अदखलपात्र आहेत, अशी टीका खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
सांगली : आमची व अन्य भाजप नेत्यांची लायकी जनतेने कधीच मतदानातून सिद्ध केली आहे. भविष्यातील निवडणुकीतही ती सिद्ध होईल. त्यामुळे गोपिचंद पडळकर यांनी केलेले आरोप अदखलपात्र आहेत, अशी टीका खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी भाजपमध्ये एकही नेता लायकीचा नसल्याची टीका केली होती. त्याबद्दल संजयकाका पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्यात चार आमदार, एक खासदार, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका अशा प्रत्येकठिकाणी जनतेने आम्हाला सत्तेवर बसवून आमची लायची सिद्ध केली आहे. भविष्यात होणाऱ्या निवडणुकीतही पुन्हा जनता आमची लायकी सिद्ध करणार आहे. त्यामुळे जनताच प्रत्येकाची लायकी ठरवित असते, ती कोणी नेत्याने ठरवायची नसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे, आरोप-प्रत्यारोप करीत बसू नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करा. त्यानुसार आम्ही फक्त जनतेच्या हिताची विकासकामे करतो. विकासकामे करताना कधीही मी राजकारण आणलेले नाही. त्यामुळे जनतेचे माझ्यावरील प्रेम आजही कायम आहे.
राज्याचे दिग्गज नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आगामी लोकसभा निवडणुकीत मला देशात उच्चांकी मतांनी निवडून आणण्याचा संकल्प करीत माझ्या कर्तृत्वाची पक्षातूनही पोहोचपावती दिली आहे. मी लोकसभा निवडणूक लढणार आहे, हे यातून स्पष्टच आहे. काँग्रेसकडून आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी ते लोकसभा निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले आहे. अजून कोणी विरोधक ठरलेला नाही. या गोष्टी जेव्हा निश्चित होतील तेव्हा याबाबत जास्त सविस्तर बोलता येईल.
पडळकर यांची नाराजी नेमकी कशामुळे आहे, हे मला माहित नाही. ते माहिती करून घेण्याची गरज नाही. त्यांनी नक्कीच गैरसमज करून घेतला आहे. तो दूर करणे आमचे काम नाही, कारण गैरसमज ज्याचे त्याने दूर करायचे असतात. मला विक्रमी मतांनी निवडून आणण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे ते नाराज झालेत, की माझे सर्व पक्षात मित्र आहेत, म्हणून नाराज झालेत, याची कोणतीही कल्पना नाही.
मला अनेक राष्टÑवादी, काँग्रेस नेत्यांनी गत लोकसभा निवडणुकीत मदत केली होती. त्यामुळे त्यांच्या ऋणात राहून जनहिताच्या कामांत मदत करावी लागते. त्यातून जर कोणी दुखावले असेल, तर त्याला नाईलाज आहे. जेव्हा त्यांचे हे गैरसमज दूर होतील, तेव्हा खुप उशिर झालेला असेल. अर्थात त्यांनी पक्षाशीच संबंध नाही म्हटल्यावर त्यांची दखल घेण्याची किंवा गैरसमज दूर करण्याची गरजच नाही.
वैयक्तिक वाद कोणाशीही नाही!
माझे वैचारिक मतभेद कोणाशीही असू शकतात, पण वैयक्तिक वाद कोणाशीही नाही. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये मी कधीही आ. सुमनताई पाटील यांच्या विकासकामांच्या आड आलो नाही. त्यांनीही तसे राजकारण कधी माझ्याबरोबर केले नाही. अजितराव घोरपडे यांच्याशीही कधीही वैयक्तिक वादाचा विषय आला नाही, असे संजयकाका पाटील म्हणाले.