सांगलीचा पारा ९.२ अंश सेल्सिअसवर!

By admin | Published: January 6, 2017 12:15 AM2017-01-06T00:15:29+5:302017-01-06T00:15:29+5:30

थंडीचा आणखी एक विक्रम : जिल्हा गारठला; तापमानात अचानक २.८ अंशाने घट

Sangli para 9.2 degrees Celsius! | सांगलीचा पारा ९.२ अंश सेल्सिअसवर!

सांगलीचा पारा ९.२ अंश सेल्सिअसवर!

Next

सांगली : जिल्ह्याच्या सरासरी किमान तापमानात गुरुवारी अचानक घट होऊन पारा ९.२ अंश सेल्सिअसवर आला. गेल्या सहा वर्षांतील जानेवारीतील हे नीचांकी तापमान नोंदले आहे. येत्या दोन दिवसांत तापमान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.
सांगली जिल्ह्याचा सरासरी किमान पारा बुधवारी १२ अंशावर होता. चार दिवसांमध्ये हा पारा ११ अंशाच्या खाली येईल, असा अंदाज होता. मात्र अचानक पारा २.८ अंशाने खाली गेल्याने जिल्हा गारठला. दुपारी भर उन्हातही थंडी लोकांनी अनुभवली. जिल्ह्यात ११ डिसेंबर रोजी १०.४ इतके यंदाचे सर्वात कमी तापमान नोंदले गेले होते. २००८ नंतरचे डिसेंबर महिन्यातील हे सर्वात कमी तापमान होते. त्यानंतर पुन्हा जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली. पारा १३ ते १६ अंशाच्या दरम्यान राहिला. बुधवारपासून पुन्हा जिल्ह्यात थंडी वाढत आहे. बुधवारी कमाल तापमानात एक अंशाने घट होऊन किमान तापमानही १२ अंशावर आले होते. त्यानंतर अवघ्या चोवीस तासात पारा अचानक खाली आला आणि थंडीने आणखी एक विक्रम प्रस्थापित केला.
गुरुवारी पहाटे बोचऱ्या थंडीचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. नंतर थंडी कमी होईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात दिवसभरात तापमानात घटच होत राहिली. भारतीय हवामान खात्याकडे दिवसभरातील किमान तापमानाची नीचांकी नोंद झाली. जिल्ह्यातील थंडीचे वातावरण आणखी दोन दिवस तरी कायम राहील, असा अंदाज आहे. डिसेंबर आणि जानेवारीत सर्वात थंड हवेचे ठिकाण म्हणून नोंद असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही सांगली अधिक गारठली आहे. गुरुवारचेही तापमान महाबळेश्वर, कोल्हापूर, सोलापूरपेक्षा कमी दिसून आले.
हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार ९ ते १२ जानेवारीपर्यंत पुन्हा किमान तापमानात वाढ होणार असल्याने, थंडी कमी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
संकेतस्थळांचा गोंधळ
भारतीय हवामान खात्याच्या मुख्य संकेतस्थळाने गुरुवारी सांगलीचे किमान तापमान ९.२ इतके नोंदविले, तर पुणे येथील हवामान खात्याने त्यांच्या दैनंदिन हवामान वृत्तांतात जिल्ह्याचे गुरुवारचे किमान तापमान १०.७ इतके नोंदविले आहे. दोन्ही संकेतस्थळांमधील आकडेवारीचा हा गोंधळ वारंवार अनुभवास येत आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुख्य संकेतस्थळाची निरीक्षणे आजवर अचूकतेच्या जवळपास गेल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Sangli para 9.2 degrees Celsius!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.