हळदीच्या व्यापाराला चालना देणार सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस, प्रवासाचा खर्च घटणार; गाडीचे वेळापत्रक.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 05:37 PM2024-08-12T17:37:10+5:302024-08-12T17:37:40+5:30

हळदीच्या बाजारपेठांना जाण्याचे मार्ग सोपे

Sangli-Parli Vaijnath Express to promote turmeric trade | हळदीच्या व्यापाराला चालना देणार सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस, प्रवासाचा खर्च घटणार; गाडीचे वेळापत्रक.. जाणून घ्या

हळदीच्या व्यापाराला चालना देणार सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस, प्रवासाचा खर्च घटणार; गाडीचे वेळापत्रक.. जाणून घ्या

सांगली : जिल्ह्यातील हळदीच्या व्यापाराला चालना देण्यासाठी मार्च २०२४ पासून सुरू झालेली सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस उपयोगी ठरणार आहे. याशिवाय राज्यातील व राज्याबाहेरील हळदीच्या बाजारपेठांना जाणेही या गाडीच्या माध्यमातून सुलभ होणार आहे.

सांगलीची हळद बाजारपेठ जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू येथील शेतकरी सांगलीच्या बाजारपेठेतच येत असतात. सांगली येथे हळद पॉलिश करणे तसेच पावडर करण्याची प्रक्रियाही होते. दरवर्षी २५ ते ३० लाख क्विंटल हळद पावडर सांगलीतून विदेशात निर्यात होते. महाराष्ट्रात सांगली शिवाय नांदेड, हिंगोली, जालना, बसमत, औरंगाबाद येथे हळदीची शेती होते. निजामाबादच्या हळदीचीही ख्याती आहे. या सर्व हळदीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गावांना, जिल्ह्यांना सांगलीशी जोडण्याचे काम सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस करीत आहे. परळी वैजनाथ येथून अनेक हळदीच्या बाजारपेठा जवळ आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना किंवा त्या भागातील शेतकऱ्यांना सांगलीला येणे या गाडीच्या माध्यमातून सोपे झाले आहे.

गाडीचे वेळापत्रक असे..

  • परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनहून रोज सकाळी सव्वा आठ वाजता गाडी (क्र. ११४११) सुटते. लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूरमार्गे ही गाडी सांगली स्थानकावर सायंकाळी ६:५० वाजता पोहोचते.
  • सांगली स्थानकातून रोज रात्री ८:३५ वाजता गाडी (क्र. ११४१२) सुटते. पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूरमार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी ६:१७ला परळी वैजनाथला पोहोचते.
  • परळी वैजनाथ ते सांगलीदरम्यान ही गाडी २५ रेल्वे स्थानकावर थांबते.


परळी वैजनाथ स्थानकापासून कुठे किती अंतर
निजामाबाद : २०० कि. मी.
बसमत : ११० कि. मी.
नांदेड : १००
औरंगाबाद : २००
जालना : १६०
हिंगोली : १६०
परभणी : ६६
बीड : ९१

कमी खर्चात प्रवास

परळी वैजनाथ ते सांगलीचे तिकीट फक्त १५० रुपये आहे. सांगली स्थानकापासून येथील हळद बाजारपेठेत हाकेच्या अंतरावर आहे. जर सांगली हळद बाजारातील काम तासाभरात आटोपले तर तो शेतकरी त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता सांगली स्थानकावरून परत जाऊ शकतो.

महाराष्ट्रातील हळद व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांनी सांगली-परळी एक्स्प्रेस गाडीचा फायदा घ्यावा. जास्तीत जास्त शेतकरी व व्यापाऱ्यांनी यातून प्रवास करावा. महाराष्ट्राच्या हळद बाजारपेठेच्या वृद्धीसाठी उपयुक्त सांगली-परळी रेल्वे गाडीला प्रोत्साहन द्यावे. - रोहित गोडबोले, सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप

Web Title: Sangli-Parli Vaijnath Express to promote turmeric trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.