सांगलीत मतदान घटल्याचा फटका संजयकाका की विशाल पाटलांना?, निकालाच्या चर्चांना उधाण
By अशोक डोंबाळे | Published: May 9, 2024 03:27 PM2024-05-09T15:27:07+5:302024-05-09T15:29:27+5:30
सांगलीत ४.४३ टक्के मतांची घट; चंद्रहार चमत्कार दाखविणार का?
अशोक डोंबाळे
सांगली : सांगली लोकसभेसाठी २०१९ मध्ये ६५.३८ टक्के मतदान झाले होते. २०२४ च्या निवडणुकीत ३.११ टक्के मतदानाची घट होऊन ६२.२७ टक्के मतदान झाले. पण, या घटलेल्या टक्केवारीचा फटका भाजपचे खासदार संजय पाटील यांना की अपक्ष विशाल पाटील यांना बसणार, याविषयी तर्कवितर्क मतदारांमध्ये सुरू आहेत. या दोघांना धक्का देऊन महाविकास आघाडीचे पैलवान चंद्रहार पाटील चमत्कार दाखविणार, अशी चर्चा रंगली आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदार याद्यांतील घोळ, ईव्हीएममधील बिघाड, तुरळक वादावादी वगळता ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडणूक आयोगाने केलेल्या प्रभावी जनजागृतीकडे पाठ फिरवून नागरिकांनी मतदान करण्यास निरुत्साह दाखवला. सांगली लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
भाजपचे संजय पाटील आणि उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील अशी दुरंगी लढत होईल की काय, अशी चर्चा सुरवातीला रंगली होती. विशाल पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी बंडखोरी केली. यामुळे सांगली लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीने तिरंगी झाली. २०१९ मध्ये ६५.३८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत संजय पाटील यांनी बाजी मारली होती. पण, या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर विशाल पाटील राहिले होते. यामुळे २०२४ च्या निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीकडे सर्वांचेच लक्ष होते. पण, मतदार आणि प्रशासनाच्या निरुत्साहामुळे मतदानाची आकडेवारी ३.११ टक्क्यांनी घट होऊन ६२.२७ टक्के मतदान झाले.
दीड लाख मताधिक्य मिळण्याचा दावा
साडेचार टक्के घटलेल्या मतदानाचा फटका संजय पाटील यांना बसणार की विशाल पाटील यांना हे ४ जूनलाच स्पष्ट होणार आहे. हे जरी खरे असले तरी संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्या समर्थकांनी मीच दीड लाखांवर मताधिक्याने विजयी होईन, असे दावा केला आहे.
जयंत पाटील यांचा अंदाज
उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील सध्या तरी शांत आहेत. पण, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव चंद्रहार किंवा विशाल पाटील करतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. हा दावा जयंत पाटील यांनी कशाचा आधारावर केला असवा, अशी चर्चा मतदारांमध्ये रंगली आहे.
मिरजमध्ये ०.४८ टक्के वाढ
मतदानाची सर्वाधिक घट ५.३९ टक्के खानापूर विधानसभा मतदारसंघात झाली आहे. त्यानंतर पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात ५.१९ टक्के घट झाली आहे. तसेच सर्वात कमी मतदानाची घट २ टक्के सांगली आणि २.०७ टक्के जत विधानसभा मतदारसंघात झाली आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात ३.२५ टक्के घट झाली. तसेच मिरज मतदारसंघात ०.४८ टक्के मतदान वाढले.
२० निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी
वर्ष टक्केवारी
१९५१ ६०.६९
१९५७ ६५.७८
१९६२ ६६.०३
१९६७ ६७.८१
१९७१ ५८.२१
१९७७ ५७.६०
१९८० ६४.०४
१९८३ ५८.९५
१९८४ ६५.०५
१९८९ ५८.६५
१९९१ ५१.८०
१९९६ ५८.०४
१९९८ ५९.६२
१९९९ ६८.४७
२००४ ५८.४१
२००६ ५०.५७
२००९ ५२.१२
२०१४ ६३.४६
२०१९ ६५.७८
२०२४ ६०.९५
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी
विधानसभा मतदारसंघ - २०१९ - २०२४
तासगाव - ६९.३३ -६६.०८
सांगली - ६२.९७ - ६०.९७
खानापूर - ६४.३२ - ५८.९३
पलूस - ६७.५४ - ६२.३५
जत - ६२.८३ - ६०.७६
मिरज - ६४.३१ - ६४.७९
एकूण - ६५.३८ - ६२.२७