सांगलीत पेट्रोलचे नाबाद शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:22 AM2021-05-30T04:22:04+5:302021-05-30T04:22:04+5:30
छाया: सुरेंद्र दुपटे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पेट्रोलच्या किमतीने सांगलीत अखेर शंभरी पार केली. शनिवारी सांगलीत १०० रुपये ...
छाया: सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पेट्रोलच्या किमतीने सांगलीत अखेर शंभरी पार केली. शनिवारी सांगलीत १०० रुपये ०१ पैसे, तर अन्य शहरांत १०० रुपये २४ पैसे दराने विक्री सुरू झाली. डिझेलदेखील ९० रुपये ६३ पैशांवर पोहोचले आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर पेट्रोलच्या किमती दररोज ३ ते ७ पैशांनी वाढत होत्या, पण महिनाभरानंतरही ९९ रुपयांच्या आसपासच खेळत होते. अन्य काही जिल्ह्यांत यापूर्वीच शंभरी पार झाली होती. कोल्हापुरात बुधवारी पेट्रोल १०० रुपयांवर पोहोचले होते. सांगलीत मात्र शुक्रवारी मध्यरात्री शंभरावर पोहोचले.
सरकारी व खासगी कंपन्यांच्या दरांत काही पैशांचा फरक असतो. त्याचबरोबर डेपोपासून पंप किती अंतरावर आहे, यावरही काही पैशांनी फरक पडतो. त्यानुसार जिल्हाभरात पेट्रोलच्या शनिवारच्या किमती १०० रुपये ०१ पैशापासून १०० रुपये २४ पैशांपर्यंत वेगवेगळ्या राहिल्या.
डिझेलदेखील ९० रुपये ६३ पैसे ते ९० रुपये ८४ पैसे प्रतिलिटर या दराने विकले जात आहे.
सर्व तेल कंपन्या दररोजच्या किमती मध्यरात्री १२ वाजता संगणकीय व्यवस्थेत अपलोड करतात. रात्रभर सुरू राहणाऱ्या पंपांवर रात्रीपासूनच नव्या दराने विक्री सुरू झाली होती. शहरातील पंपांवर पहाटे सहापासून नवे दर पाहायला मिळाले. गेले काही दिवस पेट्रोल ९९ रुपये ९५ पैशांदरम्यान असले तरी १०० रुपयांत एकच लिटर पेट्रोल मिळत होते. त्यामुळे पेट्रोलने यापूर्वीच अप्रत्यक्षरीत्या शंभरी गाठली होती. आता त्याने १०० रुपयांवरची पातळी गाठली तरीही लिटरभरच पेट्रोल मिळणार आहे.
चौकट
पॉवर पेट्रोल यापूर्वीच शंभरी पार
पॉवर, स्पीड, एक्स्ट्रा प्रीमियम आदी नावांनी विकले जाणारे पेट्रोल महिनाभरापूर्वीच १०० रुपयांवर गेले होते. शनिवारची त्याची किंमत १०२ रुपये ८७ पैसे इतकी होती. साध्या पेट्रोलच्या किमतींनी हैराण झालेल्या ग्राहकांनी या पेट्रोलकडे कधीच पाठ फिरविली होती. त्यामुळे अनेक पंपांनी त्याची विक्री बंद केली, किंवा शिल्लक साठा कसाबसा संपवून टाकला.
कोट
पेट्रोलने १०० रुपयांचा दर यापूर्वीच अप्रत्यक्षपणे गाठला होता. ९९ रुपये ९५ पैसे किमत असतानाही एक लिटरसाठी १०० रुपये आकारले जात. आज त्याने शंभरी पार केली असली तरी प्रत्यक्षात एकच लिटर तेल मिळणार आहे.
- सत्यजित पाटील, पेट्रोल पंप चालक