सांगली-पेठ रस्ता अखेर ‘नॅशनल हायवे’कडे! : अधिसूचना जारी, सहापदरीकरणाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:48 PM2017-11-30T23:48:51+5:302017-11-30T23:49:03+5:30
सांगली : सांगली-पेठ रस्त्याच्या दुरुस्तीवरून रस्ते बचाव कृती समितीने उभारलेल्या आंदोलनाला गुरुवारी अखेर यश आले.
सांगली : सांगली-पेठ रस्त्याच्या दुरुस्तीवरून रस्ते बचाव कृती समितीने उभारलेल्या आंदोलनाला गुरुवारी अखेर यश आले. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (नॅशनल हायवे) वर्ग झाला आहे. याबाबतची अधिसूचनाही प्रसिद्ध केली. त्यामुळे या रस्त्याच्या नूतनीकरणासह सहापदरीकरणाचा मार्गही मोकळा झाला आहे.
वाहनांची गर्दी, अपघातांचे वाढते प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे सांगली-पेठ रस्ता चर्चेत आला. या रस्त्यावर खड्डे चुकविताना काही जणांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील सांगलीपासून पेठपर्यंतच्या गावांतील नागरिकांनी कृती समिती स्थापन करून आंदोलन हाती घेतले.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी या रस्त्यावरील खड्ड्यांत दिवे लावून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाची तीव्रता वाढवत नेली. अखेर हा रस्ता डिसेंबरअखेर खड्डेमुक्त न झाल्यास ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हायवे’ असे नामकरण करण्याचा इशाराही कृती समितीने दिला. यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने पॅचवर्कचे काम हाती घेतले होते. पण रस्त्याची दुर्दशा पाहता, पॅचवर्क करून त्याची दुरुस्ती होणारी नाही, हा रस्ता नव्यानेच करण्याची गरज आहे. त्यातच शासनाने सांगली-पेठ हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्त्वत: मंजूर केला होता. महामार्ग प्राधिकरणनेही या रस्त्याचा सर्व्हे केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्ग प्राधिकरणकडे हा रस्ता हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पण त्याला मूर्त स्वरुप येत नव्हते. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी रस्ता हस्तांतरणासाठी पुढाकार घेतला. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला. संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नाला गुरुवारी अखेर यश आले.
हस्तांतरण लवकरच होणार
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांनी सांगली-पेठ रस्त्याची पाहणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची लांबी, त्यावरील शासकीय मालमत्ता, फलक, झाडे यांची माहिती घेतली होती. आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर झाला आहे. लवकरच रस्त्यासंदर्भातील कागदपत्रे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द केली जातील, असे बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.