सांगली-पेठ रस्त्याचा प्रश्न: गडकरींनी सहाशे कोटीचा नारळ फोडला, तरीही मुहूर्त लांबला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 07:01 PM2023-03-14T19:01:04+5:302023-03-14T19:01:28+5:30
आता काम पावसाळ्यानंतरच
सांगली : दहा वर्षांपासून रेंगाळलेला पेठ ते सांगली रस्त्याचा प्रश्न केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी सोडविला म्हणून अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गडकरींच्या हस्तेच आष्टा येथे सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा नारळ फोडण्यात आला. महिन्यात काम मार्गी लागणार होते, पण नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा कामाला मुदतवाढ दिल्याने हे काम लांबणीवर गेले आहे. सतत दहा वर्षे निधी मंजुरीच्या वेगवेगळ्या घोषणा करुनही हे काम मार्गी लागत नसल्याने नव्या निविदेच्या प्रक्रियेबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.
सांगली-पेठ रस्त्याच्या प्रश्नावर अनेक आंदोलने झाली. देशभरात या खराब रस्त्याची चर्चा झाली. राज्य शासनाकडील हा रस्ता भाजप सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्याची घोषणा २०१७ मध्ये केली. प्रत्यक्ष हा रस्ता वर्ग होण्यासाठी २०२२ उजाडावे लागले. प्रत्येक कामात अशी दिरंगाई होतच राहिली. कधी पॅचवर्क, कधी काँकिटीकरण, तर कधी मजबुतीकरणाच्या नावावर निधी मंजूर केला गेला.
निविदाही प्रसिद्ध झाल्या. प्रत्यक्षात या रस्त्यावरचा एक दगडही हलला नाही. केलेले पॅचवर्क कधीही दहा दिवसांवर टिकले नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघात व्हायचे तसे होत राहिले व लोकांचे जीव जात राहिले. दीड महिन्यापूर्वी याच रस्त्यासाठी ५९६ कोटी २९ लाख रुपयांच्या चौपदरीकरण कामाची निविदा प्रसिद्ध झाली. आता याच निविदा कामास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
निविदेची सध्यस्थिती काय
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच १७ जानेवारीस निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या कामासाठी १० मार्च २०२३ पर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत होती. १३ मार्चला निविदा उघडण्यात येणार होत्या. प्रत्यक्षात सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकशी केल्यानंतर निविदेला महिन्याची मुदतवाढ दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता काम पावसाळ्यानंतरच
मुदतवाढीमुळे निविदा प्रक्रिया निश्चित होण्यास एप्रिलचा पहिला पंधरवडा जाणार आहे. त्यानंतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईपर्यंत पावसाळा लागणार. या कामासाठी २४ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. पावसाळ्यात रस्त्याचे काम करता येत नसल्याने पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरमध्येच मुहूर्त लागू शकतो.