सांगली-पेठ रस्त्याच्या कामाला मिळाला मुहुर्त, ८८१ कोटीचा खर्च
By शीतल पाटील | Published: November 20, 2023 04:16 PM2023-11-20T16:16:33+5:302023-11-20T16:18:19+5:30
निविदा निश्चित करूनही पाच महिन्याचा कालावधी लोटला
सांगली : पेठ ते सांगली रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांइतकीच आश्वासने या रस्त्याच्या विकासाबाबत देण्यात आली होती. या रस्त्यासाठी ८८१.८७ कोटीची निविदा निश्चित करूनही पाच महिन्याचा कालावधी लोटला. आता प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामाला १५ डिसेंबरपूर्वी सुरूवात होणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
वाहनांची वाढती गर्दी, अपघातांचे वाढलेले प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे ४१ किलोमीटरचा सांगली-पेठ रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे. चौपदरीकरणासाठी सहा वर्षांपासून लढा सुरू आहे. सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन केले. त्यानंतर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. प्राधिकरणाने चौपदरीकरणाचा आराखडा तयार करून केंद्राला सादर केला. शासनाने कामाला तत्त्वत: मंजुरीही दिली. गतवर्षी रस्त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली; पण अर्थ समितीची मान्यता नसल्याने ठेकेदारांनी निविदा भरण्याबाबत सावध भूमिका घेतली. अखेर अर्थ समितीच्या मान्यतेनंतर निविदा प्रक्रियेला गती आली होती.
८८१,८७ कोटी रुपये खर्चाचे जयपूर (राजस्थान) येथील आर. एस. बी. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मिळाले आहे. आता कंपनीकडून आराखडे तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाणार आहे. रस्त्याच्या मध्य भागातून मापे टाकणे व संपूर्ण लांबी मोजण्याचे काम सध्या सुरू आहे. रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे यासाठी आवश्यक असणारी यंत्रणाही कंपनीकडून उभारली जात आहे. येत्या १५ डिसेंबरपूर्वी काम सुरू होईल, असे महामार्ग प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.