इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये सांगलीचे खेळाडू
By admin | Published: March 27, 2017 10:42 AM2017-03-27T10:42:02+5:302017-03-27T10:42:02+5:30
विविध चित्तथरारक चार विक्रमांची नोंद
आॅनलाईन लोकमत
सांगली : सांगलीत रविवारचा दिवस विविध चित्तथरारक विक्रमांनी नोंदला गेला. पाण्यातील योगासनांसह पाठीवर वजन घेऊन डिप्स मारणे, अशा एकूण चार विक्रमांची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये झाली. क्रीडाभारती सांगली व श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.
सकाळी गणेशनगरमधील रोटरी क्लबच्या जलतरण तलावात नीलेश राजाराम जगदाळे (पद्माळे, ता. मिरज) याने सलग दोन तास पाण्यावर तरंगून योगासनांचा विक्रम केला. यामध्ये नीलेशने पद्मासन, गरूडासन, ताडासन, धनुरासन, मत्स्यासन, नमस्कारासन, शवासन, एकपादासन, अनंतासन, द्विपादासन अशी विविध आसने करून दाखवली. यापूर्वी सलग एक तास पाण्यावर तरंगून योगासन करण्याचा विक्रम नीलेशने दोन तास पाण्यावर तरंगून मोडला.
दुपार सत्रात श्रीमती गरवारे कन्या महाविद्यालयात पाठीवर वजन घेऊन एक मिनिटात जास्तीत जास्त डिप्स मारण्याचा विक्रम झाला. यामध्ये वैभव माईणकरने पाठीवर ६० पौंड वजन घेऊन सर्वाधिक ४६ डिप्स मारल्या, हरी महाबळ याने पाठीवर १०० पौंड वजन घेऊन ३९ डिप्स मारल्या, तर आकाश जुगळेने पाठीमागे टाळी मारून ३६ डिप्स मारल्या. डिप्सचा विक्रम नोंद झालेले तिन्ही खेळाडू गावभागातील श्री समर्थ व्यायामशाळेत सराव करतात. चारही विक्रमांच्या नोंदीसाठी दिल्लीहून विश्वजित रॉय चौधरी निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
यशस्वी खेळाडूंना आ. सुधीर गाडगीळ व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी क्रीडाभारतीचे राष्ट्रीय महामंत्री राज चौधरी (पुणे) होते. राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. संजय देव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी क्रीडाभारतीचे सहमंत्री हरिदास प्रसन्न (नागपूर), क्रीडा भारती सांगलीचे अध्यक्ष शंकरराव काळे, कार्याध्यक्ष शरद इनामदार, श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप जोगळेकर, सांगली अर्बन बँकेचे संचालक बापू हरिदास, दीपक लेले, मधुकर पाटील, भूपाल चौगुले, भूषण वझे, केदार रसाळ, सुभाष कागवडेकर, सुनील सुतार, संदीप भागवत आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)