धुळ्यातील सराईत गुन्हेगार सांगली पोलिसांच्या जाळ्यात, २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By शीतल पाटील | Published: October 25, 2023 03:31 PM2023-10-25T15:31:24+5:302023-10-25T15:31:47+5:30
सांगली : सांगलीत घरफोडी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. त्यांच्याकडून शहरातील चार घरफोडीचे गुन्हे ...
सांगली : सांगलीत घरफोडी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. त्यांच्याकडून शहरातील चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. कैलास चिंतामण मोरे (वय ४३ ) आणि जयप्रकाश राजाराम यादव ( ३५ दोघेही रा. सोनगीर, आंबेडकर नगर, धुळे ) अशी संशयितांची नावे आहेत. चोरट्याकडून पोलिसांनी ३३ तोळे सोन्याचे दागिने, ५९३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार, रोख रक्कम असा एकूण २३ लाख ७१ हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे.
काही महिन्यांपासून जिल्ह्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्याकरिता पोलिसांनी गस्त वाढविली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकास घरफोडीतील दोघे मणेराजुरी (ता. तासगाव)च्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तासगाव–मणेराजुरी रस्त्यावर सापळा रचला. काही वेळाने एका विना नंबरप्लेटच्या कारमधून संशयित आले. पोलिसांना हालचाली संशयास्पद वाटल्याने तातडीने दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सोने - चांदीचे दागिने, घरफोडीकरता लागणारे साहित्य, रोख रक्कम असा ऐवज आढळला. चौकशीत दोघांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून विश्रामबाग, मिरज आणि संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेले चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, पोलीस अधिकारी पंकज पवार, सिकंदर वर्धन यांच्यासह पोलीस कर्मचारी बिरोबा नरळे, सागर लवटे, अमर नरळे, सागर टिंगरे, विक्रम खोत, अजय पाटील आदींसह अन्य सहभागी होते.
चोरटे सराईत
एलसीबीने अटक केलेले दोन्ही संशयित सराईत गुन्हेगार आहेत. कैलास मोरे याच्यावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये तसेच गुजरातमध्ये एकूण ७० हून अधिक तर जयप्रकाश यादव याच्यावर २१ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.