सांगली पोलीस झाले हायटेक; वाहनांना जीपीएस यंत्रणा, ७० ठिकाणी सीसीटीव्ही सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 12:54 PM2018-05-02T12:54:28+5:302018-05-02T12:54:28+5:30
अत्याधुनिक यंत्रणेमुळे गुन्हेगारीला आळा बसणार
सांगली : सांगली पोलीस दलाने आधुनिकतेची कास धरत हायटेक यंत्रणा उभारलीय. पोलीस दलातील वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून महापालिका हद्दीत ७० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीवर लक्ष ठेवलं जाणाराय.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते व पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांच्या उपस्थितीत मंगळवारी या दोन्ही यंत्रणांचं लोकार्पण करण्यात आले. पोलीस दलातील चारचाकी व दुचाकी अशा ८८ वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली. यामुळे या वाहनाचं लोकेशन, त्याचा वेग, वाहन कुठे थांबले आहे, याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळणाराय. याशिवाय गुन्हा घडलेल्या ठिकाणी वाहन तातडीनं पाठवणं सोयीचं होणाराय. जीपीएस यंत्रणेमुळे व्हीआयपी, मंत्र्यांच्या दौऱ्यात वाहनांचं अचूक लोकेशन मिळेल. तसंच परजिल्ह्यात आरोपीला आणण्यासाठी गेलेल्या वाहनाची अचूक माहितीदेखील पोलिसांना मिळेल.
जीपीएससोबतच महापालिका हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरेही मंगळवारी सुरू करण्यात आले. महापालिका हद्दीतील ३१ महत्वाच्या चौकात ७० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. त्यामुळे वाहतुक नियंत्रणासोबतच जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा बसेल. व्हीआयपी बंदोबस्त, मोर्चा, आंदोलनातील चालू घडामोडीची माहितीही पोलिसांना यामुळे मिळणार आहे. पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्हींची मोठी मदत होणाराय.