सांगली पोलिसांनी लावला आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा छडा
By श्रीनिवास नागे | Published: July 16, 2023 02:14 PM2023-07-16T14:14:54+5:302023-07-16T14:15:17+5:30
दुचाकी, मोबाईल, रोकडसह ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
इस्लामपूर (जि. सांगली) : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात जबरी चोऱ्या करत धुमाकूळ घातलेल्या ओडिसा राज्यातील आंतरराज्य टोळीतील चार जणांना अटक करत सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या पोलिसांनी ८ गुन्हे उघडकीस आणले. चोरट्यांकडून दोन दुचाकी, तीन मोबाईल आणि १ लाख ३० हजारांची रोकड असा ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
नानी सिवा नागरोळ (वय ४०), एम. रायडु (वय २०), संतोष रामु औल (वय २५, तिघे रा. पाकलापल्ली,असका जि. गंजम, राज्य ओडिसा) आणि रोहित गोपाल प्रधान (वय-२२, रा. कलिंकनगर, मंत्र्याळ जि. झाजपुररोड, राज्य ओडिसा) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या टोळक्याला येथील न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या पथकाने चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथे भाड्याने खोली घेऊन वास्तव्यास राहिलेल्या या सराईत टोळीने इस्लामपूर, शिराळा, कागल, कोडोली आणि गडहिंग्लज याठिकाणी केलेल्या चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
परजिल्ह्यात चोरी करून ही चौकडी दोन दुचाकीवरून धूम ठोकत पेठ वडगाव येथील खोलीवर वास्तव्यास येत होती.
चोरी करताना ते मोबाईलचा वापर टाळत असत. गेल्या सहा महिन्यांपासून ते वडगाव येथे रहात होते. पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच या चौघांनी पंढरपूरच्या दिशेने पलायन केले होते. याची माहिती पंढरपूर पोलिसांना देत इस्लामपूरच्या पथकाने चोरट्यांचा माग सुरूच ठेवला होता. पंढरपूर जवळील नदीत चोरटे पोहायला उतरल्यावर साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना पोहण्याचा बहाणा करत पाण्यात उतरून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
सुभाष भोपाल पाटील (६५) यांच्या सायकलच्या कॅरेजला लावलेली ५० हजार रुपयांची रोकड चोरल्याची कबुली या चोरट्यानी दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील सहायक पोलिस निरीक्षक अनिल जाधव,हवालदार अरुण पाटील, सजन पाटील, गणेश वाघ, दीपक पाटील, प्रशांत देसाई, अलमगीर लतीफ, सतिश खोत, अभिजीत पाटील यांनी भाग घेतला. हवालदार गणेश वाघ अधिक तपास करत आहेत.