सांगलीत पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती; गुन्हेगारांची कुंडली तयार
By शरद जाधव | Published: October 19, 2023 08:00 PM2023-10-19T20:00:54+5:302023-10-19T20:01:35+5:30
गुन्हेगारांच्या कृत्यावर अंकुश रहावा यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
सांगली: आगामी सण, उत्सवात गुन्हेगारांच्या कृत्यावर अंकुश रहावा यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गेल्या दहा वर्षांमध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलन आणि आदान प्रदान मोहिम राबविण्यात आली.
खून, खुनाचा प्रयत्न आणि गंभीर स्वरूपाची दुखापत केल्याने गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी अदययावत करण्यात आली. यावेळी सर्वांकडून एक माहिती भरून घेण्यात आली. त्यात सध्या कोणता व्यवसाय करतात, उपजिवीकेची साधने काय आहेत, त्यांचे मित्र कोण आहेत, सध्या कुठे व कोणासोबत राहण्यास आहे यासह मोबाइल क्रमांक, नातेवाइकांचेही मोबाइल क्रमांक घेण्यात आले.
रेकॉर्डवरील या गुन्हेगारांनी पुन्हा कोणताही गुन्हा करू नये तसेच कोणत्याही गुन्ह्यात सहभाग घेऊ नये याबाबत अधिकाऱ्यांनी कडक सुचना दिल्या. विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहातून जामीनावर बाहेर असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आणि बीट मार्शलनी वारंवार तपासणी करून ते सध्या काय करतात, त्यांच्या वर्तनात सुधारणा होत आहे का याची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्यास व वारंवार गुन्ह्यात सहभाग आढळून आल्यास तडीपारीचा प्रस्ताव करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले. यावेळी एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.