सांगलीत घरफोडी गुन्हा दाखल : पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास
By admin | Published: November 3, 2014 11:10 PM2014-11-03T23:10:32+5:302014-11-03T23:31:56+5:30
विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला
सांगली : विश्रामबागच्या मंगळवार बाजार परिसरातील गजानन कॉलनीतील तुषार बाबासाहेब बुटाले यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. आज (सोमवार) सायंकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला.गजानन कॉलनीतील ‘अविनाश’ अपार्टमेंटमध्ये बुटाले राहतात. शनिवारी दुपारी ते कुटुंबासह परगावी नातेवाईकांकडे गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडी व कोयंडा कापून घरात प्रवेश केला. बेडरुममधील कपाट उघडून त्यातील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमध्ये ठेवलेले पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पलायन केले. जाताना चोरट्यांनी दरवाजा बाहेरुन लावून घेतला होता. यामुळे शेजाऱ्यांनाही चोरीचा हा प्रकार लक्षात आला नाही. सोमवारी सायंकाळी बुटाले कुटुंबीय परगावाहून परत आले असता, दरवाजाचा कडी व कोयंडा तोडल्याचे दिसून आले. ते घरात गेले असता, कपाटातील साहित्य विस्कटलेले व दागिने, रोकड नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
त्यानंतर बुटाले यांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. ही चोरी स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेवून केली असावी, अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली जात आहेत. (प्रतिनिधी)
पावत्या पळविल्या
चोरट्यांनी दागिन्यांबरोबर दागिने खरेदीच्या पावत्याही पळविल्या आहेत. असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. दागिन्यांमध्ये बांगड्या, चेन, अंगठीचा समावेश आहे.
जाताना चोरट्यांनी दरवाजा बाहेरुन लावून घेतला होता. यामुळे शेजाऱ्यांनाही चोरीचा हा प्रकार लक्षात आला नाही.