पोलीस हत्या प्रकरण : मृतदेह बाहेर फेकून पुरावा नष्ट करणे या दोघांना भोवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 01:58 PM2018-07-22T13:58:54+5:302018-07-22T14:02:12+5:30
पोलीस शिपाई समाधान मांटे यांच्या हत्ये प्रकरणी बहुचर्चित हॉटेल ‘रत्ना डिलक्स’चा मालक कुमार कुमसगे (वय 48 वर्ष) व व्यवस्थापक शब्बीर नदाफ या दोघांना (वय 45 वर्ष) अखेर शनिवारी रात्री अटक करण्यात आली.
सांगली : पोलीस शिपाई समाधान मांटे यांच्या हत्ये प्रकरणी बहुचर्चित हॉटेल ‘रत्ना डिलक्स’चा मालक कुमार कुमसगे (वय 48 वर्ष) व व्यवस्थापक शब्बीर नदाफ या दोघांना (वय 45 वर्ष) अखेर शनिवारी रात्री अटक करण्यात आली. मांटे यांचा मृतदेह हॉटेलबाहेर फेकून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांची संख्या 6 झाली आहे. विश्रामबाग येथील कुपवाड रस्त्यावरील हॉटेल रत्ना डिलक्समध्ये दारू पिण्याच्या वादातून समाधाने मांटे यांच्यावर धारदार हत्याराने 18 वेळा वार करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हा सर्व प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्याआधारेच पोलिसांनी पुढील तपासाला दिशा दिली आहे.
याप्रकरणी मुख्य संशयित झाकीर जमादार, त्याचा मेहुणा वासिम शेख, साथीदार अन्सार पठाण व राजू नदाफ यांना अटक केली आहे. या सर्वांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मांटे यांची हत्या झाल्यानंतर हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी हॉटेलच्या व्यवस्थापकासह काही वेटरनी मांटे यांचा मृतदेह हॉटेलबाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हॉटेलचा मालक कुमार कुमसगे हा विश्रामबाग येथे सह्याद्रीनगरमध्ये राहतो. शनिवारी सकाळी 7 वाजता त्याला घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. व्यवस्थापक नदाफ व चार वेटरनाही ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून चौकशी सुरू होती. मांटे यांचा खून झाल्यानंतर नदाफने कुमसगे याला याची माहिती दिली. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी कुमसगेच्या सांगण्यावरुन नदाफने वेटरच्या मदतीने मांटे यांचा मृतदेह हॉटेलबाहेर फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कुमसगे व नदाफला अटक केली आहे. चार वेटरना सोडून देण्यात आले आहे.