सांगली पोलिसांनी नोंदविले ‘मोक्का’ कारवाईचे शतक

By admin | Published: July 31, 2016 12:16 AM2016-07-31T00:16:28+5:302016-07-31T00:18:32+5:30

गुन्हेगारांना हादरा : जिल्ह्यातील आणखी काही टोळ्या रडारवर; दहशतीला आळा घालण्यासाठी जोरदार प्रयत्न

Sangli police reported that the 'Mokka' action was a century | सांगली पोलिसांनी नोंदविले ‘मोक्का’ कारवाईचे शतक

सांगली पोलिसांनी नोंदविले ‘मोक्का’ कारवाईचे शतक

Next

सचिन लाड / सांगली
गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी सांगली पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याच्या उपसलेल्या हत्याराचा गुन्हेगारांनी चांगलाच धसका घेतला आहे. गेल्या चार वर्षांत ‘मोक्का’ कायद्यांतर्गत दहा टोळ्यातील शंभर गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे यासह लूटमार करणाऱ्या काही टोळ्या रडारवर आहेत. येत्या काही दिवसात मोक्काची कारवाई आणखी प्रभावीपणे राबविली जाणार असल्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख नेहमीच चढ-उतार राहिला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, दहशत माजविणे, सावकारीतून लोकांची मालमत्ता बळकाविणे, भरदिवसा दरोडे टाकून लूटमार, या गुन्ह्यांनी गेल्या काही वर्षात कळसच गाठला आहे. पोलिसांनी या टोळ्यांना जेरबंद केले; पण जामिनावर बाहेर सुटल्यानंतर त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच राहतात. टोळ्यातील हे गुन्हेगार कारागृहात राहणे समाजाच्याद्दष्टीने चांगले असल्याने पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाईचा धडका लावला आहे. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दिलीप सावंत यांनी या कायद्याचा मोठ्या प्रमाणात वापर करुन अनेक टोळ्यांना हिसका दाखविला. सावकार राजेंद्र जाधव, भोला जाधव टोळीला मोक्का लावला. सावकारीतून मोक्का लागलेली सांगलीची राज्यात पहिलीच कारवाई होती. करेवाडी (ता. जत) व कवठेमहांकाळ येथील लूटमार करणाऱ्या टोळीतील २२ जणांनाही मोक्का लावला. सांगलीतील लुटमारी करणाऱ्या इसर्डे टोळीच्याही त्यांनी मुसक्या आवळल्या. तीन वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी सात ते आठ टोळ्यांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई केली होती.
सावंत यांच्या कारवाईचा धसका घेऊन अनेक गुन्हेगारांनी शहरातून पलायन केले होते. काही गुन्हेगारांनी शांत राहणे पसंत केले होते, पण त्यांची बदली होताच संजयनगरमधील गुंड म्हमद्या नदाफ टोळीने डोके वर काढले. त्याने मनोज ऊर्फ गोरखनाथ माने याचा खून केला. या खूनप्रकरणी म्हमद्यासह तब्बल २६ जणांना अटक केली. यामध्ये प्रत्यक्ष खुनात सहभाग असलेले तसेच म्हमद्याला मदत करणाऱ्या संशयितांचा समावेश आहे. खुनानंतर म्हमद्याने पोलिसांना महिनाभर पळविले होते.
पोलिसांनी त्याच्यासह २६ जणांना मोक्का लावला आहे. सध्याचे पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन महिन्यातच दुर्गेश पवार टोळीला मोक्का कारवाईचा दणका दिला आहे.
या कारवाईचा शहरातील गुन्हेगारांनी चांगलाच धसका घेतला आहे. मोक्का कायदा लागू करण्यासाठी डझनभर गुन्हे दाखल असायला पाहिजेत, असे नाही. संघटित होऊन आर्थिक फायद्यासाठी केलेला गुन्हा या कायद्यात बसतो.

Web Title: Sangli police reported that the 'Mokka' action was a century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.