सांगली पोलिसांवर मध्य प्रदेशमध्ये हल्ला, आणखी नऊ पिस्तूल जप्त; दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 08:45 PM2017-10-08T20:45:18+5:302017-10-08T20:45:46+5:30

सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत पिस्तुलांची तस्करी करणा-या रॅकेटचा छडा लावण्यास मध्य प्रदेशमध्ये गेलेल्या सांगली पोलिसांच्या पथकावर तस्करांनी हल्ला चढविला.

Sangli police seized nine pistols in Madhya Pradesh; Both of them are in control | सांगली पोलिसांवर मध्य प्रदेशमध्ये हल्ला, आणखी नऊ पिस्तूल जप्त; दोघे ताब्यात

सांगली पोलिसांवर मध्य प्रदेशमध्ये हल्ला, आणखी नऊ पिस्तूल जप्त; दोघे ताब्यात

Next

सांगली : सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत पिस्तुलांची तस्करी करणा-या रॅकेटचा छडा लावण्यास मध्य प्रदेशमध्ये गेलेल्या सांगली पोलिसांच्या पथकावर तस्करांनी हल्ला चढविला. तस्करांना पकडताना झालेल्या झटापटीत अझहर पिरजादे हा पोलीस कर्मचारी जखमी झाला. तरीही पथकाने दोघा तस्करांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नऊ पिस्तूल जप्त केली आहेत. तस्करांना घेऊन पोलिसांचे पथक रविवारी पहाटे सांगलीत दाखल झाले.

गेल्या आठवड्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पिस्तुलांची तस्करी करणा-या सनीदेव प्रभाकर खरात (वय २०, रा. सिंधु-बुद्रुक, दहीवडी, ता. माण, जि. सातारा) व संतोष शिवाजी कुंभार (२७, नागझरी, ता. कोरेगाव, जि. सातारा) या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून देशी बनावटीची सात पिस्तूल, २७ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला होता. दोघेही सांगलीत पिस्तूल विक्रीसाठी आले होते. दोघांच्या चौकशीत त्यांनी ही पिस्तुले मध्य प्रदेशमधील धामनोद या गावातून तस्करी केल्याची कबुली दिली होती. चार दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक राजन माने यांचे पथक संशयित खरात व कुंभार या दोघांना घेऊन मध्य प्रदेशला रवाना झाले होते. तेथील पोलिसांच्या मदतीने पथकाने तस्करांचा शोध घेतला. प्रतापसिंग भाटिया याच्यासह दोघांची नावे समजली. तसेच या गावात पिस्तूल तयार करण्याचा कारखानाच असल्याची माहिती लागली.

धामनोद गावात पिस्तूल विक्रीचा बाजारच भरतो. मध्य प्रदेशमधील एक पोलीस मदतीसाठी घेऊन पथकाने या बाजारात भाटियाचा शोध ठेवला. भाटिया व त्याच्या साथीदार पथकाच्या नजरेस पडला. पण त्यांना पोलीस आपला पाठलाग करीत असल्याची चाहूल लागली. भाटिया व त्याच्या साथीदाराने पथक त्यांच्यावर झडप घालण्यापूर्वीच त्यांनी पथकावर हल्ला चढविला. यामध्ये पथकातील अझहर पिरजादे हा पोलिस जखमी झाला. तरीही पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडले. त्यांना तातडीने वाहनात घालून या गावात न थांबता थेट स्थानिक पोलीस ठाणे गाठले. तिथे भाटियासह दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

दोघांची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे देशी बनावटीची नऊ पिस्तूल सापडली. ती जप्त करण्यात आली आहेत. भाटिया हा पिस्तूल तयार करणा-या कारखान्याचा मालक असल्याचे समजते. पण या कारवाईबाबत पथकातील अधिका-यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे या कारवाईचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही.

Web Title: Sangli police seized nine pistols in Madhya Pradesh; Both of them are in control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.