सांगली : प्रकाश आंबेडकर हे केवळ नावाचेच वारसदार : मधुकर कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 04:19 PM2019-01-05T16:19:56+5:302019-01-05T16:22:18+5:30
प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचित घटकांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण आजअखेर त्यांनी या घटकांसाठी काहीच काम केलेले नाही. वंचित समाजांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न उशिरा सुचलेले शहाणपण आहे.
सांगली : प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचित घटकांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण आजअखेर त्यांनी या घटकांसाठी काहीच काम केलेले नाही. वंचित समाजांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न उशिरा सुचलेले शहाणपण आहे. डॉ. बाबासाहेबांच्या नावाचा वापरही केवळ राजकारणासाठी केला. मी बाबासाहेबांचा वारसदार असे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी टीका साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केला.
मधुकर कांबळे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकांच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. त्यांच्याकडून वंचित घटकांची दिशाभूल सुरू आहे. हे समाज घटक त्यांना बळी पडणार नाहीत. त्यांच्यासोबत जाणाऱ्या समाज घटकांचा नेहमीच भ्रमनिरास झाला आहे. मखराम पवार, भांडे यांच्यासारखे अनेकजण त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने आले, पण नंतर दूर झाले, असा दाखलाही त्यांनी दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय, समतेचे प्रतिक होते. पण प्रकाश आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या नाव लावले. राजकारणासाठी त्यांच्या नावाचा वापर केला. पण काम मात्र काहीच केलेले नाही. त्यांनी केवळ नावाने नाही तर कर्माने बाबासाहेबांचे वारसदार व्हावे.
वंचित आघाडीचा प्रयोग केवळ निवडणुकीपुरता घेऊ नये. सामाजिक न्याय आणि समता हा शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. खºया अर्थाने बाबासाहेबांचे वारसदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मधुकर कांबळे आहेत. प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा टोलाही श्री. कांबळे यांनी लगाविला.
अनुसुचित जाती,ओबीसी, भटक्या समाजातील ज्या लहान जाती आहेत त्यांच्यापर्यंत विकासाचा प्रवाह गेलेला नसल्याने या जातींमध्येही विषमता दिसून येते. अनुसुचित जातीच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोचवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. अण्णाभाऊंसारख्या जागतिक दर्जाच्या साहित्यिकाचे, समाजसुधारकाचे स्मारक व्हावे असा प्रयत्न केला मात्र कुणी ते गांभीर्याने घेतले नाही.
अण्णाभाऊंचे मुंबईच्या चिरागनगरमध्ये एका झोपडीवजा घर एका दाक्षिणात्य व्यक्तीकडे गहाण ठेवले होते. ते घर मी घर सोडवून घेतले आहे. त्या जागेवर आता त्यांचे स्मारक बांधणार आहोत. तसेच त्यांच्या वारसदारांना राहण्यासाठी फ्लॅट देण्याचे आश्वासनही कांबळे यांनी दिले. वाटेगाव (ता. वाळवा) येथील स्मारकाचे पुनरुज्जीवन करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.