सांगली : वनवासाची चाहूल लागताच रामाचा धावा : धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:20 PM2018-12-11T13:20:35+5:302018-12-11T13:22:33+5:30
साडेचार वर्षे सत्ता असताना राम दिसला नाही, मग आताच कुठून राम मंदिराचा मुद्दा समोर आला. केंद्रातील नरेंद्र व महाराष्ट्रातील देवेंद्र सव्वाशे कोटी जनतेला फसवत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर केली.
बोरगाव : राजकारणातील वनवासाची चाहूल लागताच भाजप अन् शिवसेनेकडून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातो. देवाच्या नावाने राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा हा डाव अनेक वर्षांपासून खेळला जात आहे.
साडेचार वर्षे सत्ता असताना राम दिसला नाही, मग आताच कुठून राम मंदिराचा मुद्दा समोर आला. केंद्रातील नरेंद्र व महाराष्ट्रातील देवेंद्र सव्वाशे कोटी जनतेला फसवत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर केली.
बोरगाव (ता. वाळवा) येथे अशोकराव पाटील यांचा एकसष्टीनिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.
मुंडे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनची स्वप्ने दाखवून सव्वाशे कोटी जनतेची फसवणूक केली आहे. धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून खेळवायचे चालले आहे.
ते म्हणाले, अशोकराव पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे. ज्यांनी स्वत: कर्ज काढून कुटुंबाला वाचविले, त्यांनी दुसऱ्याला कर्ज देणाऱ्या सहकारी संस्था उभारल्या. यालाच शून्यातून जग निर्माण करणे म्हणतात.
आमदार जयंत पाटील म्हणाले, अशोकराव पाटील यांचे कार्य तरूणांना व सहकाराला प्रेरणादायी आहे. भाजप केवळ वल्गना करणारे सरकार ठरले आहे. पुढील निवडणुकीनंतर त्यांची सत्ता राहणार नाही, म्हणून राम मंदिराची पुडी सोडली जात आहे. आगामी निवडणुकीसाठी समविचारी पक्षांना एकत्रित करून लढा देणार आहोत. खासदार राजू शेट्टी महिनाअखेरपर्यंत राष्ट्रवादीसोबत येतील.
उदयसिंह पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. धैर्यशील पाटील यांनी आभार मानले. यावेळी दिलीपराव पाटील, माणिकराव पाटील, अरूण लाड, पी. आर. पाटील, विनायक पाटील, नेताजी पाटील, शहाजी पाटील, रूपाली सपाटे, संग्राम पाटील, देवराज पाटील, सचिन हुलवान, माणिक शा. पाटील, कार्तिक पाटील, देवराज देशमुख, उदयसिंह शिंदे, डॉ. शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, अविनाश पाटील, भगवान पाटील, बाळासाहेब पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
तुम्ही ऊस पिकवा, आम्ही तोडतो...
मुंडे यांना जयंत पाटील म्हणाले की, कृष्णा काठाने अनेक दिग्गज नेते महाराष्ट्राला दिले. त्यात बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, राजारामबापू, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचा समावेश आहे. यावर मुंडे म्हणाले, गोदावरीचे आणि कृष्णेचे अतूट नाते आहे. तसेच साहेब तुमचे आणि आमचेही आहे. तुम्ही ऊस पिकवायचा आणि तो आम्ही तोडायचा, असे म्हणताच एकच हशा पिकला.