सांगली : महासभेत पुन्हा जागांचा बाजार, महापालिकेची मंगळवारी सभा, पाच जागा भाडेतत्त्वावर देण्याचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:10 PM2018-02-16T13:10:16+5:302018-02-16T13:13:18+5:30
सांगली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना खुल्या जागा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू आहे. शहरातील एका बिल्डरला महापालिकेने २९ वर्षे मुदतीने अवघ्या चाळीस हजार वार्षिक भाड्याने जागा देण्याचा विषय अजेंड्यावर घेतला आहे. या विषयासह आाणखी चार जागांचे प्रस्तावही सभेत चर्चेला आहेत. त्यामुळे ही महासभा वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
सांगली : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना खुल्या जागा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू आहे. शहरातील एका बिल्डरला महापालिकेने २९ वर्षे मुदतीने अवघ्या चाळीस हजार वार्षिक भाड्याने जागा देण्याचा विषय अजेंड्यावर घेतला आहे. या विषयासह आाणखी चार जागांचे प्रस्तावही सभेत चर्चेला आहेत. त्यामुळे ही महासभा वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
महापौर हारूण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार २० रोजी महासभा होत आहे. कुपवाड येथील १२८९.७० चौरस मीटरची खुली जागा एका बिल्डराच्या संस्थेला २९ वर्षे भाड्याने देण्यात येणार आहे. त्यासाठी नगररचना विभागाने वार्षिक चाळीस हजार रुपये भाडे निश्चित केले आहे. या विषयाला मान्यता देण्याचा प्रस्ताव महासभेच्या अजेंड्यावर आहे.
यापूर्वी महापालिकेच्या खुल्या जागा खासगी संस्थांना देण्याचा प्रस्ताव महासभेत आला होता. त्यांना नाममात्र भाडे देखील आकरण्यात येणार होते. मात्र या विषयांवरून महासभेत गदारोळ झाला होता. महापालिकेच्या जागा नाममात्र दराने भाड्याने देऊन महापालिकेचा आर्थिक तोटा होतो. जागा भाड्याने देऊ नयेत व यापूर्वी दिलेल्या जागा ताब्यात घ्याव्यात, असा निर्णय झाला होता.
मात्र पुन्हा जागांचा विषय महासभेत आला आहे. या बिल्डराने मे २०१६ मध्ये जागा मिळावी म्हणून महापालिकेला प्रस्ताव सादर केला होता. तब्बल पावणे दोन वर्षानंतर हा विषय अजेंड्यावर घेतला आहे. आता महापालिकेच्या निवडणुका चार-पाच महिन्यांवर आहेत. त्यामुळे सत्ताधारी कॉँग्रेसच्या मंडळींनी जाता-जाता काही जागांचा बाजार करण्याचा डाव आखला आहे.
वॉर्ड क्रमांक ३८ मधील दोन खुल्या जागा एका युथ फौंडेशनला ९ वर्षे मुदतीवर भाड्याने देण्यात येणार आहे. तर एका शिक्षक संघटनेला अभ्यासिका, वाचनालय व गुणवत्तावाढीसाठी इमारत भाडेतत्त्वावर देणे व त्याचे भाडे निश्चित करण्याचा विषयदेखील महासभेच्या विषयपत्रिकेवर आहे.