सांगली:आरवडेत ‘हुसेनवाला डे’च्या आठवणींना उजाळा : १९६५च्या भारत-पाकिस्तान युध्दातील शौर्यगाथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 08:11 PM2018-09-24T20:11:06+5:302018-09-24T20:15:06+5:30
आरवडे (ता. तासगाव) येथे भारतीय लष्करातील सेकंड मराठा काली पांचवीच्या बहादूर आजी-माजी सैनिकांनी मोठ्या जल्लोषात ‘हुसेनवाला डे’ साजरा केला. यावेळी या तुकडीच्या सदस्यांनी जुन्या वैभवशाली आठवणींना उजाळा दिला.
मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथे भारतीय लष्करातील सेकंड मराठा काली पांचवीच्या बहादूर आजी-माजी सैनिकांनी मोठ्या जल्लोषात ‘हुसेनवाला डे’ साजरा केला. यावेळी या तुकडीच्या सदस्यांनी जुन्या वैभवशाली आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल शिवाजी बाबर होते, तर कर्नल एन. डी. जानकर प्रमुख पाहुणे होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात २१ सप्टेंबर १९६५ रोजी लढाई झाली होती. या युद्धात सेकंड मराठा काली पांचवी या सेनेच्या तुकडीने अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानच्या सैन्याला पंजाब गुरुदासपूर येथील हुसेनवाला गावात येण्यापासून रोखून परत पाठवले. भारत सरकारने तुकडीच्या या शौर्याची दखल देऊन गौरव केला. त्यामुळे या तुकडीतील आजी, माजी सैनिक ‘हुसेनवाला डे’ साजरा करतात. सांगली जिल्'ात आरवडे येथे पहिल्यांदाच हा विजय दिवस साजरा करण्यात आला
ब्रिटिश काळात सेकंड मराठा बटालियनची स्थापना झाली. यावर्षी आॅगस्टमध्ये या बटालियनला अडीचशे वर्षे पूर्ण झाली. या बटालियनला शौर्याचा इतिहास आहे. १९६५ च्या युद्धात कर्नल टी. टी. नोलन यांच्या नेतृत्वाखाली या तुकडीने हुसेनवाला गावात तीन हजार सैनिकांना सळो की पळो करून सोडले होते. या भारतीय सेनादलच्या तुकडीत फक्त आठशे सैनिक होते. या तुकडीच्या पराक्रमामुळे पाक सैन्याला भारतात पाय ठेवता आला नाही. पण या मोहिमेत भारतीय सैन्यदलाचे कर्नल नोलन व ११ सैनिक शहीद झाले. भारत सरकारने या पराक्रमाची दखल घेत या तुकडीला मानाचे पारितोषिक देऊन गौरविले. त्यामुळे हा दिवस हुसेनवला विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन कॅप्टन लक्ष्मण चव्हाण व कॅप्टन रामहरी राडे यांनी केले. यावेळी कॅप्टन प्रताप शिंदे, कॅप्टन महादेव कदम, कॅप्टन शिवाजी जाधव, कॅप्टन बाबासाहेब माने, कॅप्टन प्रकाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी जिल्'ातील ३०० हून अधिक माजी सैनिक कुटुंबियांसह उपस्थित होते.
अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू
तब्बल ३० ते ४० वर्षांनंतर काही निवृत्त सैनिकांची भेट झाली. एकमेकांना अलिंगन देताना त्यांना गहिवरून आले. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले होते. काही निवृत्त सैनिकांची दुसरी व तिसरी पिढीही सैन्य दलात दाखल झाली आहे. अनेकांनी भारतीय सेवेत असताना १९६२ च्या चीन युद्धातील, तर १९७१ च्या पाकिस्तान युद्धातील, तसेच १९९९ च्या कारगिल युद्धातील थरारक प्रसंग सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात बाहेर गावाहून आलेल्या माजी सैनिकांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.