सांगली : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जिल्ह्यात मोर्चे, बंद, धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 05:52 PM2018-08-13T17:52:52+5:302018-08-13T17:56:05+5:30
धनगर समाजाच्यावतीने सोमवारी सांगलीसह जिल्ह्यात मोर्चे, बंद, धरणे, निदर्शने अशाप्रकारची आंदोलने करण्यात आली. शासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत प्रश्न सुटला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सांगली : धनगर समाजाच्यावतीने सोमवारी सांगलीसह जिल्ह्यात मोर्चे, बंद, धरणे, निदर्शने अशाप्रकारची आंदोलने करण्यात आली. शासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत प्रश्न सुटला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सांगलीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांनाही रोखले.
आष्टा बसस्थानक चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी युवकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले. दिवसभर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे म्हणाले, धनगर समाज विखुरलेला आहे. समाजाने एक झाले पाहिजे. समाज पेटून उठला, तरच आरक्षण मिळेल. महिन्या-दीड महिन्यात आरक्षणासाठी जोरदार संघर्ष केला पाहिजे. \
नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणूक होईल. त्याचबरोबर विधानसभा निवडणूक होण्याचीही शक्यता आहे. टाटा कन्सल्टन्सी काय अभ्यास करणार आहे? घटनेनेच आम्हाला आरक्षण दिले आहे. ते देण्यास सरकार चालढकल करीत आहे. शासनाने आमचे नुकसान करू नये.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, युवकचे अध्यक्ष संग्राम पाटील, आष्टा शहर अध्यक्ष शिवाजी चोरमुले, शिवाजीराव ढोले, आष्टा पीपल्स बँकेचे अध्यक्ष दिलीप वग्याणी, उपाध्यक्ष रामचंद्र सिद्ध, माणिक शेळके, संग्राम फडतरे, भाजप जिल्हा युवा मोर्चाचे प्रवीण माने, अमोल पडळकर, दक्षिण भाग सोसायटीचे उपाध्यक्ष मारुती माने, माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सिद्ध, भगवान बोते, अर्जुन माने, आनंदराव शेळके, सुनील माने, सोमाजी डोंबाळे, वीर कुदळे, शरद आटुगडे, दीपक ढोले, बिरु बोते, किरण काळोखे, मयूर धनवडे, के. ए. माने, समीर गायकवाड, अशोक भानुसे यांनी मनोगत व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाचा विसर त्यांना पडला आहे. समाजाला घटनेने दिलेले आरक्षण लवकर द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.