मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत सांगली लय भारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:25 AM2021-03-06T04:25:15+5:302021-03-06T04:25:15+5:30
सांगली : प्रसुती कालावधीत महिलांना पूरक आहाराबरोबरच इतर साधनांची उपलब्धता व्हावी व बाळ सुदृढ व्हावे या हेतूने सुरू ...
सांगली : प्रसुती कालावधीत महिलांना पूरक आहाराबरोबरच इतर साधनांची उपलब्धता व्हावी व बाळ सुदृढ व्हावे या हेतूने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने प्रभावी कामगिरी केली आहे. उद्दिष्टापेक्षा १०३ टक्के कामगिरी करीत राज्यातही उल्लेखनीय काम केले आहे.
गरोदरपणाच्या कालावधीत मातेला योग्य आहार व पूरक साधने मिळाल्यास जन्माला येणारे बाळ सुदृढ होते. मात्र, अनेक ठिकाणी महिलांना या कालावधीत अडचणींना सामोरे जावे लागते. यातून कुपोषणासह मातेच्या आरोग्यावर परिणाम होणाऱ्या समस्या समोर येत आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने मातृवंदना योजना सुरू केली आहे.
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहभागातून ही योजना राबविण्यात येते. आरोग्य विभागाकडे नोंदणी झालेल्या मातेला योजनेचा लाभ देण्यात येताे.
राज्यातील काही भागात योजनेची कामगिरी समाधानकारक नसलीतरी जिल्ह्यात मात्र, चांगली अंमलबजावणी सुरू आहे.
जिल्ह्यासाठी २०१७ ते मार्च २०२१ पर्यंत ६८ हजार ९६ लाभार्थी महिला निवडीचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट पूर्ण करत ७० हजार ८१४ जणांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर तीस कोटी ५० लाख ९६ हजारांचे अनुदानाचे वाटप करत १०३ टक्के कामगिरी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे गरोदरपणात मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा फायदा होत आहे.
चौकट
सर्वच प्रसुतींना मिळतोय लाभ
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात प्रसुती झाल्यास त्याची नोंदणी स्थानिक प्रशासनाकडे होत असते. गरोदरपणाची नोंदणी झाल्यापासूनच हप्ता स्वरूपात ही रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या खात्यावर दिली जात आहे.
कोट
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी हाेत असल्याने लाभार्थींंना त्याचा चांगला लाभ होत आहे. गेल्या पाच वर्षांतील उद्दिष्ट पूर्ण करत अजून लाभार्थींनाही योजनेचा लाभ दिल्याने चांगली कामगिरी करता आली आहे. जिल्ह्यातील अन्य लाभार्थींनीही योजनेचा लाभ घ्यावा. स्थानिक आरोग्य प्रशासनाकडे नोंदणी केल्यास लाभ मिळणे सोयीचे होणार आहे.
डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी