सांगली : शामरावनगरमधील नागरिकांचे आंदोलन, पावसामुळे रस्ते चिखलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:14 PM2018-05-11T16:14:27+5:302018-05-11T16:14:27+5:30
सांगली शहर परिसरात बुधवारी झालेल्या पावसाने नागरिकांची दैना उडाली आहे. रस्ते चिखलमय झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी महापालिका प्रवेशद्वारा समोर प्रतिकात्मक संसार उभारून आंदोलन केले.
सांगली : शहरातील शामरावनगर परिसर, त्रिमूर्ती कॉलनी, रामकृष्ण सोसायटी, विनायक नगर, अप्पासाहेब पाटीलनगर, गादी कारखाना, रामनगर, रुक्मिणीनागर परिसरातील बुधवारी झालेल्या पावसाने नागरिकांची दैना उडाली आहे. रस्ते चिखलमय झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी महापालिका प्रवेशद्वारा समोर प्रतिकात्मक संसार उभारून आंदोलन केले.
येत्या दोन दिवसात या परिसरातील रस्त्यावर मुरूम टाकण्याची ग्वाही प्रशासनाने दिली. शामरावनगरमध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. ड्रेनेजसाठी चरी खोदल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे काही दिवसापूर्वी शामरावनगर परिसरातील नागरिकांनी सोयी सुविधासाठी आंदोलन केले होते.
तातडीने नागरी सुविधा न दिल्यास महापालिकेच्या दारासमोर संसार थाटण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी मुरमीकरण करून देण्यावे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळले नाही.
बुधवारी सायंकळी सांगली शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शामरावनगरमधील सर्वच रस्ते चिखलात रुतले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडणेही अडचणीचे झाले आहे . त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज महापालिकेकडे धाव घेतली.
महापालिकेच्या दारातच चूल पेटवून संसार थाटला. येत्या ८ दिवसात निर्णय न झाल्यास आयुक्त बंगल्यावर सजीव संसार नागरिकांचा थाटण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी येत्या दोन दिवसात मुरमीकरण करण्यात येईल अशी ग्वाही दिली. आंदोलनाचे नेतृत्व अमर पडळकर व वैशाली अमर पडळकर यांनी केले.
या आंदोलनास मनसे माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेवक राजू गवळी, स्वाती शिंदे, असिफ बावा, शहाजी भोसले, शैलेश पवार, आश्रफ वांकर, सलिम पन्हाळकर, उत्तम मोहिते, सुरज चोपडे, आदित्य पटवर्धन, प्रियानंद कांबळे,रोहित घुबडे पाटील, चेतन भोसले, सुधाकर पाटील, संदीप दळवी, रज्जाक नाईक या सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.