सांगली : उपनगरांत रस्ते दलदलीत, घरे पाण्यात, नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 03:00 PM2018-05-12T15:00:15+5:302018-05-12T15:00:15+5:30
सांगली शहरात गुरुवारी झालेल्या पहिल्याच वादळी पावसाने महापालिकेच्या यंत्रणेचे वाभाडे काढले. गावठाण परिसरात अनेक घरात पाणी शिरले होते. स्टेशन चौकात पोलिसांची घरे, तसेच पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयालाही पाण्याने वेढा दिला. उपनगरांतील रस्ते तर चिखलात रुतले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. ड्रेनेज यंत्रणा कोलमडल्याने सांडपाणी रस्त्यावर आले होते.
सांगली : शहरात गुरुवारी झालेल्या पहिल्याच वादळी पावसाने महापालिकेच्या यंत्रणेचे वाभाडे काढले. गावठाण परिसरात अनेक घरात पाणी शिरले होते. स्टेशन चौकात पोलिसांची घरे, तसेच पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयालाही पाण्याने वेढा दिला. उपनगरांतील रस्ते तर चिखलात रुतले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. ड्रेनेज यंत्रणा कोलमडल्याने सांडपाणी रस्त्यावर आले होते.
पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयालाही पाण्याने वेढा
वादळी वारा व मुसळधार पावसामुळे नागरिकांची दैना उडाली होती. खणभाग, गावभाग, विश्रामबाग परिसरातील गावठाण भागात अनेक घरात पाणी शिरले होते. गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
गावठाणापेक्षा उपनगरांतील नागरिकांचे मोठे हाल झाले. ड्रेनेज, पाणी योजनेच्या खुदाईमुळे उपनगरांत रस्त्यांची चाळण झाली आहे. शामरावनगर, रामकृष्ण परमहंस सोसायटी, आप्पासाहेब पाटीलनगर, त्रिमूर्ती कॉलनी, विनायकनगर, अष्टविनायक कॉलनी, कोल्हापूर रस्ता, रामनगर, रुक्मिणीनगरातील रस्ते दलदलीत अडकले. खुल्या भूखंडांवर तर सांडपाणी साचून दलदल, घाणीचे साम्राज्य होते.
मुख्य शामरावनगरच्या रस्त्यावरूनच दलदलीतून सुरू होणारा प्रवास पुढे गुडघाभर चिखलातून होतो. त्यातूनच विद्यार्थी, महिलांना ये-जा करावी लागत आहे. आता हे चित्र साठलेले पाणी हटेपर्यंत कायम राहणार आहे. एवढेच नव्हे, तर पावसाळ्यात यापेक्षा भयावह अवस्था होऊन नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल होणार आहे.
उपअधीक्षक कार्यालयात सांडपाणी
शहरात ड्रेनेजच्या कुचकामी कारभाराने गेल्या महिन्याभरापासून गटारगंगा रस्त्यांवर, घरांमध्ये शिरत आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने पुन्हा तळे साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. स्टेशन चौकात तर शुक्रवारीही हे गटारगंगेचे पाणी चक्क उपअधीक्षक कार्यालयात शिरले. त्यातूनच अधिकारी, पोलीस व नागरिकांना ये-जा करावी लागत होती. अनेक ठिकाणी विद्युतपंप लावून सांडपाणी हटविण्याचे काम सुरू होते.