सांगली : साळोखेंच्या ‘सिंघम’ स्टाईलने इस्लामपुरात नेते हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:08 AM2018-09-22T00:08:59+5:302018-09-22T00:12:11+5:30
इस्लामपुरातील मटका, खासगी सावकारी, भूखंड माफिया, सडकसख्याहरी, लॉजवरील बेकायदेशीर व्यवसाय, भुरटे चोरटे, विस्कळीत वाहतूक यावर पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांनी ‘सिंघम’ स्टाईलने कारवाईचा धडाका लावला
इस्लामपूर : इस्लामपुरातील मटका, खासगी सावकारी, भूखंड माफिया, सडकसख्याहरी, लॉजवरील बेकायदेशीर व्यवसाय, भुरटे चोरटे, विस्कळीत वाहतूक यावर पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांनी ‘सिंघम’ स्टाईलने कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांचे ‘गॉडफादर’ हादरले आहेत. शहरातील व्यापारी, नागरिक आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या राजकीय मंडळींनी मात्र साळोखे यांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.
सध्या इस्लामपूर पोलीस ठाण्याला कडक शिस्तीचे विश्वास साळोखे हे निरीक्षक लाभले आहेत. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक गुंडांना शहरातून तडीपार केले आहे. तेव्हापासूनच या गुंडांचे गॉडफादर असणाºया राजकीय पुढाºयांचे धाबे दणाणले होते. त्यांनी ही कारवाई थांबविण्यासाठी वजन वापरले, परंतु साळोखे कोणाच्याही दबावाला बळी पडले नाहीत. या कारवाईला बहुतेक राजकीय मंडळी वैतागली आहेत. साळोखे यांनी वाहतुकीबाबतही कडक पावले उचलली आहेत. कारवाईवेळी त्यांना शहरातील नगरसेवक, पदाधिकाºयांचा अडसर ठरत आहे.
त्यांच्या कार्यपध्दतीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, नगरपालिकेचे पक्षप्रतोद विक्रम पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अॅड. मनीषा रोटे यांच्यासह इतर राजकीय मंडळी नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी साळोखे यांच्याविरोधात रान उठवले आहे.
याबाबत साळोखे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोणाचीही हुजरेगिरी करायची मला सवय नाही. जे अयोग्य आहे, तेथे कारवाई करणारच. बदलीची भीती नाही. मी कोणत्याही पोलीस ठाण्यात रूजू होतो, त्यावेळी केवळ चारचाकी गाडीत बसेल एवढेच साहित्य घेऊन जातो. कोणत्याही राजकीय मंडळींना घाबरून कारवाई करणे थांबविणार नाही. जे लोक वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रारी करत आहेत, त्यांचे आणि पोलिसांनी ज्यांच्यावर कारवाई केली, त्यांचे लागेबांधे आहेत.
ते म्हणाले की, १५ सप्टेंबररोजी रात्री १२ वाजता येथील वाळके यांनी वाढदिवस फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा केला. त्यावेळी येथील नागरिकांनी फटाक्यांचा त्रास होत असल्याचे पोलिसांना कळवले होते. त्यामुळे आम्ही वाळके यांच्यावर कारवाई केली. परंतु अॅड. मनीषा रोटे यांनी कारवाई करू नये यासाठी दबाव आणला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या एका कार्यकर्त्याचा वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर सोडला नाही, म्हणून ते नाराज होते, तर भाजपचे विक्रम पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या गणेश मंडळातील ध्वनियंत्रणा रात्री दहानंतरही सुरू होती. त्यावर कारवाई केली म्हणून विक्रम पाटील यांनीही विरोध केला आहे. प्रत्येक कारवाईत कोणी तरी नाराज होणारच आहे. मात्र कारवाईमध्ये कोणाचीही मध्यस्थी खपवून घेणार नाही.
ऐनवेळी माघार!
विश्वास साळोखे यांच्याविरोधात इस्लामपूर बंदची हाक देण्यात आली होती. याचे नेतृत्व अॅड. मनीषा रोटे यांनी केले होते. त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांचा पाठिंबा होता. परंतु व्यापारी व नागरिकांकडून बंदबाबत संतप्त प्रतिक्रया उमटू लागल्या. त्यातच अॅड. रोटे यांना पाठिंबा देणाºयांनी काढता पाय घेतला. त्यामुळे हा बंद रद्द करण्याचा निर्णय ऐनवेळी घेण्यात आला.
विश्वास साळोखे यांनी शहरातील अवैध व्यवसायाला चाप बसवला आहे. चौका-चौकात उभी राहणारी टोळकी बंद केली आहेत. नियम धाब्यावर बसवून सुसाट वाहने चालविणाºया अल्पवयीन मुलांवरही कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई योग्यच आहे. ती शहरातील काही लोकांना अडचणीची ठरत आहे.
- रमेश शेटे, शीतल निलाखे, व्यापारी-इस्लामपूर.