Sangli: सांगली-पेठ रस्त्याची निविदा ११ रोजी उघडणार, ८८१ कोटींचा प्रकल्प, चारपदरी काँक्रीटचा रस्ता
By शीतल पाटील | Updated: May 7, 2023 13:10 IST2023-05-07T13:10:14+5:302023-05-07T13:10:36+5:30
Sangli News: सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ८८१ कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. ही निविदा गुरुवार ११ मे रोजी उघडली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

Sangli: सांगली-पेठ रस्त्याची निविदा ११ रोजी उघडणार, ८८१ कोटींचा प्रकल्प, चारपदरी काँक्रीटचा रस्ता
- शीतल पाटील
सांगली - सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ८८१ कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. ही निविदा गुरुवार ११ मे रोजी उघडली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. या कामासाठी देशभरातील वीसहून अधिक कंपन्यांनी प्री-बिडिंगमध्ये सहभाग घेतला होता.
वाहनांची वाढती गर्दी, अपघातांचे वाढलेले प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे ४१ किलोमीटरचा सांगली-पेठ रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे. या रस्त्यावर अनेकांना जीव गमावावा लागला आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी पाच ते सहा वर्षांपासून लढा सुरू आहे. सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन केले. त्यानंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला.
महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा तयार करून केंद्र शासनाला सादर केला होता. शासनाने या कामाला तत्त्वत: मंजुरीही दिली. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी रस्त्यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आली. पण अर्थ समितीची मान्यता नसल्याने ठेकेदारांनी निविदा भरण्याबाबत सावध भूमिका घेतली. पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून मान्यता देण्याचा आग्रह धरला होता. अखेर दोन महि्न्यापूर्वी ८८१ कोटी ८७ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. ही निविदा गुरुवारी उघडली जाणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात निविदा उघडली जाणार होती. पण ठेकेदार कंपनींनी काही आक्षेप नोंदविल्याने निविदेला मुदतवाढ देण्यात आली होती.