सांगली : माध्यमिक शिक्षकाचा सांगलीत निर्घृण खून, दहा दिवसांपूर्वी हल्ला : अनैतिक संबंधाचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:42 PM2018-01-06T13:42:21+5:302018-01-06T13:50:15+5:30
दहा दिवसापूर्वी अज्ञातांनी हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेले शिक्षक सुनील अण्णासाहेब आंबी (वय ४२, रा. विश्वविजय चौक, गावभाग, सांगली) यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात आठ हल्लेखोरांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून त्यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सांगली : दहा दिवसापूर्वी अज्ञातांनी हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेले शिक्षक सुनील अण्णासाहेब आंबी (वय ४२, रा. विश्वविजय चौक, गावभाग, सांगली) यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात आठ हल्लेखोरांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून त्यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सुनील आंबी हे विश्रामबाग येथील एका शाळेत शिक्षक होते. २६ डिसेंबरला रात्री साडेअकरा वाजता अज्ञात संशयितांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून तुमच्यासोबत जरा चर्चा करायची आहे, तुम्ही मुख्य बस स्थानकाजवळील शास्त्री चौकात या, असा निरोप दिला. त्यानुसार आंबी शास्त्री चौकात गेले. त्यांना पाहून संशयितांनी त्यांना अंधारात नेले. त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करताना संशयितांनी त्यांना लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण केली.
त्यांनी संशयितांच्या तावडीतून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. पण संशयितांनी त्यांना पळून जाण्याची संधी दिली नाही. त्यांच्या डोक्यात, पाठीवर, पायावर व हातावर बेदम मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर संशयित पळून गेले आहेत.
शास्त्री चौकातून जाणाऱ्या काही जणांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आंबी यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण प्रकृती चिंताजनक बनल्याने नातेवाईकांनी त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविले. पण उपचार सुरु असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.
विच्छेदन तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सांगलीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनैतिक संबंधातून त्यांचा खून झाल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी आंबी यांचे बंधू सुधीर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अजून त्यांची नावे निष्पन्न झालेली नाहीत.
महिला कोण?
सुनील आंबी यांनी एका महिलेला अनैतिक संबंध ठेवण्यासाठी धमकी दिली होती. हा प्रकार महिलेच्या पतीला समजला होता. त्याने आंबी यांना जाबही विचारला होता. यातून ही घटना घडल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चेच्या अनुषंगाने तपासाला दिशा दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. येत्या एक-दोन दिवसात याचा छडा लावला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.