सांगली : शांतिनिकेतनमध्ये लावणीने भरला रंग, रसिकांची भरभरून दाद, नृत्यांगणांच्या अदाकारीने मने जिंकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 03:15 PM2018-01-11T15:15:01+5:302018-01-11T15:22:43+5:30
घुंगरांच्या बोलावर थिरकणारी शिस्तबद्ध पावलांची नजाकत...गीत, संगीताला अर्थपूर्ण बनविणारी सुंदर अदाकारी..अशा बहारदार वातावरणात रसिकांची मने जिंकत लावणीने शांतिनिकेतनच्या लोकरंगभूमीवर नवा रंग भरला. शिट्टया आणि टाळ्यांच्या कडकडात, ढोलकीच्या तालावर शांतिनिकेतनमध्ये लावणी स्पर्धा पार पडल्या.
सांगली : घुंगरांच्या बोलावर थिरकणारी शिस्तबद्ध पावलांची नजाकत...गीत, संगीताला अर्थपूर्ण बनविणारी सुंदर अदाकारी..अशा बहारदार वातावरणात रसिकांची मने जिंकत लावणीने शांतिनिकेतनच्या लोकरंगभूमीवर नवा रंग भरला. शिट्टया आणि टाळ्यांच्या कडकडात, ढोलकीच्या तालावर शांतिनिकेतनमध्ये लावणी स्पर्धा पार पडल्या.
राज्यभरातून आलेल्या लावणी नृत्यांगणांनी, लोककलाकारांनी या स्पर्धेत जीव ओतून लावणी सादर केली. रात्री उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरु होती. यशवंत कुलकर्णी यांच्याहस्ते या स्पर्धेचे उदघाटन झाले आणि त्यानंतर एकापेक्षा एक बहारदार लावण्या सादर झाल्या.
दिलखेचक अदाकारी, बिजलीसारखे नृत्य, ढोलकीचा कडकडाट आणि रसिकांच्या शिट्टयांनी लोकरंगभूमी रोमांचीत झाली होती. राज्यभरातून आलेल्या विविध वयोगटातील कलाकारांनी लावणी सादर केली. पुरुष कलाकारही त्यात आघाडीवर होते.
जुन्या, नव्या बाजाच्या लावण्या यानिमीत्त रसिकांना बघायला मिळाल्या. स्पर्धकांसोबत रसिकांचीही अलोट गर्दी झाली होती. लोकनृत्य स्पधेर्साठी २८ तर लावणी स्पधेर्साठी ४0 संघ सहभागी झाले होते.
स्वागत महेश पाटील यांनी केले तर प्रास्ताविक मुख्य संयोजक, संस्थेचे संचालक गौतम पाटील यांनी केले. गौतम पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या लोककलांमध्ये लावणीचे स्थान सगळ्यात वरचे असले तरी ती जपण्यासाठी शासन आणि कलासंस्था काय करतात हा सवाल विचार करायला लावणाराच आहे.
लोककला आणि लोककलाकारांचे जगणे अतिशय बिकट आणि हालखीचे झाले असताना हे दोन्ही घटक जपण्यासाठी आणि स्वाभिमानाने जगवण्यासाठी प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी शांतिनिकेतन लोकविद्यापीठ संचलित लोकरंगभूमीच्या माध्यमातून अखेरपर्यंत प्रयत्न केले.
याची जाणीव ठेवूनच यंदा पहिल्यांदाच लोककलाग्राम लोकोत्सवामध्ये राज्यस्तरीय खुल्या लोकनृत्य आणि लावणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्याला खुप मोठा प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती गौतम पाटील यांनी दिली.
परीक्षक म्हणून राजेंद्र संकपाळ, सोनाली रजपूत, कल्याणी चौधरी, दिपक बिडकर, भाग्यश्री कालेकर आणि संजय पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. अनिकेत शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. आभार जीवन कदम यांनी मानले. उपसंचालक बी.आर.थोरात, एम.के.आंबोळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.