सांगली : मांगलेतील सरपंच, उपसरपंचांची खुर्ची जप्त करा, न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:24 PM2018-02-23T13:24:48+5:302018-02-23T13:39:17+5:30
मांगले (ता. शिराळा) येथील सरपंच, उपसरपंचांची खुर्ची, टेबल, कपाटे, वसुली रजिस्टर, बँकेची पास बुक आणि संगणक जप्त करुन कर्मचाऱ्यांना त्वरित रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
सांगली : मांगले (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीकडे पाच कर्मचाऱ्यांचे चार लाख ५० हजार रुपये थकीत आहेत. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने थकीत रक्कम देण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देऊनही त्यांनी दखल न घेतल्यामुळे तेथील सरपंच, उपसरपंचांची खुर्ची, टेबल, कपाटे, वसुली रजिस्टर, बँकेची पास बुक आणि संगणक जप्त करुन कर्मचाऱ्यांना त्वरित रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
मांगले ग्रामपंचायतीकडील शिवाजी रामचंद्र मोरे, आनंदा बापू कांबळे, संतोष श्रीपती तडाखे, संदीप विष्णू तडाखे या चार कर्मचाऱ्यांची चार लाख ५० हजार रुपयांची थकीत देणी ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दिली नव्हती. या प्रश्नावर कर्मचाऱ्यांनी सांगलीच्या कामगार आयुक्तांकडे दाद मागितली होती.
कामगार आयुक्तांनी कामगार आणि ग्रामपंचायतीची बाजू जाणून घेऊन कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम देण्याचा निकाल दिला होता. तरीही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंचांनी कर्मचाऱ्यांची थकीत देणी दिली नाहीत. म्हणून पुन्हा कामगारांनी ग्रामपंचायतीच्याविरोधात न्यायालयात दाद मागितली होती.
त्यानुसार ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक संलग्न)चे जिल्हा जनरल सेक्रेटरी अॅड. राहुल जाधव यांनी चार कामगारांची थकीत रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी न्यायालयात बाजू मांडली होती. ग्रामपंचायतीकडून रक्कम दिली जात नसल्याची बाजूही न्यायालयात मांडली होती. ग्रामपंचायतींची बाजूही त्यांच्याकडील वकिलांनी मांडली.
न्यायालयाने दि. १५ फेब्रुवारी २०१८ रोजी कर्मचाऱ्यांची थकीत रकमेसाठी मांगलेतील सरपंच, उपसरपंच यांच्या खुर्च्या, टेबल, कपाटे, वसुली रजिस्टर, बँकेची पासबुके, संगणक जप्त करण्यात यावे. त्यानंतर जप्त मालमत्तेची विक्री करुन येणाऱ्या रकमेतून कर्मचाऱ्यांची कायदेशीर देणी त्वरित द्यावीत, असे आदेश दिले आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अॅड. जाधव यांनी सांगितले.
फंडाच्या रकमेत दोन लाखांचा अपहार
मांगले ग्रामपंचायतीकडील पाच कर्मचाऱ्यांच्या पगारातून ८.३३ टक्के प्रमाणे फंडाची रक्कम कपात केली आहे. ही रक्कम जवळपास दोन लाखाहून अधिक आहे. चार वर्षांपासून कपात करुनही ती कर्मचाऱ्यांच्या खात्यावर भरलेली नसल्यामुळे त्या रकमेचा अपहारच झालेला आहे. या रकमेबाबतही फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अॅड. राहुल जाधव यांनी सांगितले.