सांगलीच्या जागेचा तिढा कायम, उद्धव ठाकरे निर्णयावर ठाम; निर्णय पुन्हा दिल्लीकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:55 AM2024-04-04T11:55:48+5:302024-04-04T11:57:37+5:30
काँग्रेसने सांगलीच्या हक्काच्या जागेवरील दावा सोडलेला नाही
सांगली : महाविकास आघाडीच्या बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत सांगलीच्या जागेचा तिढा सुटला नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी आम्ही सांगली सोडू शकत नाही, अशी ठाम भूमिका मांडली. त्यावर उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या सांगलीच्या उमेदवाराने प्रचारही सुरू केल्याचा पुनरुच्चार केला. तसेच, दिल्लीतील नेत्यांशी बोलणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतरही काँग्रेसने सांगलीच्या हक्काच्या जागेवरील दावा सोडलेला नाही. या जागेच्या अंतिम टप्प्यातील चर्चेसाठी बुधवारी आघाडीतील प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. त्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी सांगली मतदारसंघाबाबत काँग्रेसच्या भूमिकेचा निरोप ठाकरे गटाला दिला. परंतु शिवसेनेकडून सांगलीबाबत तडजोड करण्यास नकार देण्यात आला.
सांगलीसह तीन जागाबाबत निर्णय झाल्याशिवाय महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद घेता येणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले. त्यामुळे आजची महाविकास आघाडीची बैठक सांगली बाबत कोणताही निर्णयविना संपली. गुरुवारी पुन्हा सकाळी या विषयावर चर्चा होईल. काँग्रेसच्या दिल्लीतील श्रेष्ठींसोबत ठाकरे गटाकडून चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले.
चंद्रहार पाटील यांच्या प्रचारापासून काँग्रेस अलिप्त
महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटत नाही. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय व प्रस्ताव जिल्हा काँग्रेसने दिला होता; परंतु त्यावरही निर्णय होत नसल्याने उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारापासून काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले आहे.
विश्वजित कदम यांच्या भूमिकेकडे लक्ष ?
सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नसल्याने काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी प्रचार समितीच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या दबावतंत्रानंतरही सांगलीच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे डॉ. कदम यापुढे काय भूमिका घेणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.