भाजपविरोधात सांगलीत आत्मक्लेश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:37+5:302021-01-01T04:18:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या सत्तेसाठी भाजपने जुन्या सत्ताधीशांना पक्षात घेतले. त्यामुळे महापालिकेत घोटाळ्यांची मालिका सुरू आहे. भाजपला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या सत्तेसाठी भाजपने जुन्या सत्ताधीशांना पक्षात घेतले. त्यामुळे महापालिकेत घोटाळ्यांची मालिका सुरू आहे. भाजपला प्रभू रामांनीच सद्बुद्धी द्यावी, अशी मागणी करीत सांगलीच्या राम मंदिरासमोर नागरिक हक्क संघटनेचे वि. द. बर्वे यांनी धरणे आंदोलन केले. यात भाजपचे आजी, माजी पदाधिकारीही सहभागी झाले होते.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात बर्वे यांनी म्हटले आहे की, भाजपच आता काँग्रेसमय झाला असून, नव्यांच्या नादाने जुने भाजपवालेही भ्रष्टाचारी झाले आहेत. त्यामुळे पक्षाची रोज बदनामी होत आहे. भाजपमध्ये नव्याने आलेल्या जुन्या सत्ताधीशांच्या संगतीत जुने भाजपवालेही बिघडले आहेत. भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांच्या नादी लागून सारेच कारभारी भ्रष्ट झाले आहेत. अशाप्रकारे कारभार करून दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी व नरेंद्र मोदी यांच्यासह आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी उभा केलेला भाजप भ्रष्टाचाराच्या खाईत लोटला आहे. त्यामुळे रोज पक्षावर आरोप होत आहेत.
याची खंत वा खेद विद्यमान पक्षश्रेष्ठींना नाही. उलट या कारभाराचे समर्थनच केले जात आहे. त्यामुळे आता भाजप सुधारण्याची सुतराम शक्यता नाही. भाजपला सुबुध्दी दे, यासाठी प्रभू रामचंद्रालाच आता साकडे घालत आहोत.
महापालिकेत आरक्षण उठविणे, भाजीमंडईचे भूखंड हडपणे, कचरा प्रकल्प, विद्युत बिल अपहार, प्रसुतीगृहाच्या जागेतील गैरव्यवहार, बीओटी घोटाळे, लेखापरीक्षणातील घोटाळे, स्टेशन चौकातील भूखंड घोटाळा, शेतकरी बँकेतील पैशाचा बाजार अशा अनेक गैरव्यवहारांनी सत्ताधारी भाजप बदनाम झाली आहे. त्यांनी वेळीच याला लगाम घालून घोटाळेबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.