सांगली -शांतिनिकेतनमध्ये उलगडणार दगडांचे विश्व अनोखा उपक्रम : संकलनाच्या वाटेवरून संशोधनाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:12 PM2018-05-11T23:12:13+5:302018-05-11T23:12:13+5:30
सांगली : निसर्ग प्रत्येक ठिकाणी का बदलतो, याचे कुतूहल आणि त्यातून संशोधन पूर्वीपासूनच चालत आले आहे.
अविनाश कोळी ।
सांगली : निसर्ग प्रत्येक ठिकाणी का बदलतो, याचे कुतूहल आणि त्यातून संशोधन पूर्वीपासूनच चालत आले आहे. याच विचारातून आता परिसरातील दगडांचा संशोधक वृत्तीने शोध घेऊन त्यांच्या संकलनाचा वेगळा उपक्रम सांगलीच्या शांतिनिकेतनने हाती घेतला आहे.
सर्व वयोगटांसाठी हा उपक्रम खुला ठेवण्यात आला आहे. कोणताही खर्च न करता केवळ संशोधक वृत्ती घेऊन यात सहभागी व्हायचे आहे. प्रकार, आकार, रंग आणि वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी सजलेले दगड सहजरित्या आढळत असतात. पाण्याच्या वेगवेगळ्या प्रवाहांमध्येही दगडांचे अनेक प्रकार दिसतात. कधीही फिरस्त्याच्या हातून फिरत फिरत काही दगड परिसरात येऊन येथील मातीशी नाते जोडत असतात. या दगडांच्या आकाराला, रंगाला काहीतरी वैशिष्ट्य चिकटलेले असते. हे सारे विश्व उलगडण्याचा प्रयत्न होणार आहे.
दगडांमधून मंदिरे, प्रार्थनास्थळे, विविध वास्तू, मूर्ती, कलात्मक आविष्कार, गृहोपयोगी वस्तू यांची निर्मिती होत असते. दगडांमधील शीतलता आणि दाहकतासुद्धा उत्सुकतेचा विषय असतो. आकाशातून पृथ्वीतलावर पडलेल्या दुर्लक्षित दगडांचाही शोध अशाच प्रकारच्या संशोधनातून लागलेला आहे. दगड किती प्रकारचे असू शकतात, याचेही उत्तर कोणाकडे नाही. त्यामुळेच शक्य तेवढ्या दगडांचे संकलन करून त्यांचा संग्रह लोकांसाठी माहितीसह उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
वेगवेगळ्या जातीचे, रंगांचे दगड शोधताना प्रत्येकाने दगडांच्या प्रेमात पडावे, निसर्गाच्या कलाकृतीला दाद द्यावी, असाही उद्देश आहे. शांतिनिकेतनच्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाने यासाठी स्पर्धा घेतली आहे. वेगळ्या जातीचे, रंगांचे दगड शोधायचे, त्यांची माहिती मिळवायची आणि दगड एका पिशवीत घालून, पिशवीवर नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक लिहून तो या ग्रंथालयाकडे १ जूनपर्यंत पाठवावा, असे आवाहन शांतिनिकेतनमार्फत करण्यात आले आहे.
उपक्रमातून उभारणार संग्रहालय
उपक्रमातून जमा झालेल्या दगडांचे संग्रहालय शांतिनिकेतनच्या हिरवाईत सजणार आहे. बऱ्याचदा सापडलेले दगड नेमक्या कोणत्या प्रकारातले आहेत, याची माहिती नसते. त्यामुळे त्यांनी संकलित करून दिलेल्या दगडांची माहिती संबंधित तज्ज्ञांमार्फत घेतली जाणार आहे. संग्रहालयात दगडाच्या माहितीसह ती उपलब्ध करून दिली जाणार आहे.