Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
By अविनाश कोळी | Published: October 3, 2024 09:15 PM2024-10-03T21:15:26+5:302024-10-03T21:17:09+5:30
Maharashtra assembly Election 2024: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गुरुवारच्या सांगली दौऱ्याने भाजपला धक्का बसला. आटपाडीचे भाजप नेते राजेंद्रअण्णाा देशमुख यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला.
- अविनाश कोळी
सांगली - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गुरुवारच्या सांगली दौऱ्याने भाजपला धक्का बसला. आटपाडीचे भाजप नेते राजेंद्रअण्णाा देशमुख यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकीय पटलावर खळबळ माजली आहे.
शरद पवार गुरुवारी सायंकाळी सांगलीत आले. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या निवासस्थानी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, सदाशिवराव पाटील, वैभव पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील आदी नेत्यांनीही त्यांची भेट घेऊन चर्चा केली. राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांचा सत्कार शरद पवारांनी केला. खानापूर मतदारसंघातून त्यांनी इच्छुक असल्याचे सांगत उमेदवारीची मागणीही केली.
अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनीही शरद पवारांशी पंधरा मिनिटे बंद खोलीत चर्चा केली. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्षच त्यांच्या भेटीला आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात त्यांच्याही प्रवेशाची चर्चा रंगली. मिरज मतदारसंघातून बाळासाहेब होनमोरे यांनीही उमेदवारीची मागणी केली. यावेळी पवार गटाचे संजय बजाज, सागर घोडके, राहुल पवार आदी उपस्थित होते.
उमेदवारीची चर्चा जयंतरावांच्या उपस्थितीत
अनेक नेत्यांनी विधानसभेच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांच्यापुढे इच्छा व्यक्त केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित नसल्याने त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करु, असे आश्वासन शरद पवार यांनी सर्वांना दिले.
काँग्रेस नेत्यांची भेटही चर्चेत
सांगली विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनीही शरद पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यांच्या भेटीनेही सांगलीत राजकीय चर्चेला उधाण आले.