सांगलीची शाल्मली झाली अमेरिकन!

By admin | Published: March 30, 2016 11:28 PM2016-03-30T23:28:08+5:302016-03-30T23:48:49+5:30

स्मिथ दाम्पत्याने घेतले दत्तक : भारतीय समाज सेवा केंद्रात दत्तक विधान कार्यक्रम

Sangli shawlali was American! | सांगलीची शाल्मली झाली अमेरिकन!

सांगलीची शाल्मली झाली अमेरिकन!

Next

सांगली : दीड वर्षापूर्वी ती भारतीय समाज सेवा केंद्रात आली... जन्मत:च ‘दिव्यांग’ असलेली शाल्मली साऱ्यांचीच लाडकी बनली. दुडूदुडू धावणारी आणि बोबडे बोल बोलणारी शाल्मली बुधवारी मात्र थेट अमेरिकन झाली. भारतीय समाज सेवा केंद्रात झालेल्या कार्यक्रमात अमेरिका येथील स्मिथ दाम्पत्याने तिला दत्तक घेतले. मान्यवरांच्या उपस्थितीत हा भावनिक कार्यक्रम पार पडला. शाल्मली आता आपल्याला सोडून जाणार म्हणून केंद्रातील तिची सुश्रुषा करणारे कर्मचारीही गहिवरले होते.
भारतीय समाज सेवा केंद्रातील ‘दिव्यांग’(अपंग) असलेल्या दीड वर्षीय शाल्मलीला अमेरिकेतील स्मिथ दाम्पत्याने दत्तक घेतले. जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश एस. पी. तावडे यांच्याहस्ते व जिल्हा न्यायाधीश डी. जी. ढमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मिथ दांपत्याकडे शाल्मलीला सुपूर्द करण्यात आले.
शाल्मलीला दत्तक घेतलेले स्मिथ अमेरिकेतील सरकारी अधिकारी आहेत, तर त्यांच्या पत्नीची स्वत:ची फ्रॅँन्चाईजी आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून, त्यांनी यापूर्वी इंडोनेशिया येथून एका बालकास दत्तक घेतले आहे. आता शाल्मलीच्या रूपाने त्यांनी दुसरे मूल दत्तक घेतले आहे.
शाल्मली एका हाताने अपंग असून, अशा स्थितीतही स्मिथ दाम्पत्याने तिला दत्तक घेतल्याने त्यांच्या दातृत्वाची जाणीव दिसून येत आहे. शाल्मलीला मोठे करुन चांगले शिक्षण देण्याचा मनोदय यावेळी स्मिथ यांनी व्यक्त केला. त्यांची पत्नीही मनोगत व्यक्त करताना खूप भावनिक झाली होती. शाल्मलीला खूप प्रेमाने वाढवून तिला दर्जेदार शिक्षण देण्याचा मनोदय यावेळी त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा सत्र न्यायाधीश तावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सरकारी वकील एस. एम. पखाली, उज्वला परांजपे, वृंदा लिमये यांच्यासह संस्थेचे जर्मनी येथील स्वयंसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

भारतीयांची मानसिकता बदलणे गरजेचे
शाल्मली जन्मत: दिव्यांग असल्याने तिला भारतातील पालकांनी स्वीकारले नाही, मात्र अमेरिकेतील स्मिथ दाम्पत्याने तिला दत्तक घेतले. दत्तक विधानाच्या कायद्यानुसार त्या बालकांची आॅनलाईन माहिती भरल्यानंतर सर्वप्रथम भारतातील पालकांना प्राधान्य देणे बंधनकारक आहे. मात्र, शाल्मलीला कोणाही भारतीय पालकांनी दत्तक घेतले नाही. ही मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Web Title: Sangli shawlali was American!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.