Sangli: चुकीचे काम करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवितो, जयंत पाटील यांचं विधान
By अविनाश कोळी | Published: June 23, 2024 07:06 PM2024-06-23T19:06:35+5:302024-06-23T19:07:02+5:30
Sangli News: संपूर्ण राज्यात जिल्हा बँकेचे काम आदर्शवत सुरू आहे. विरोधक राजकारण म्हणून बँकेविषयी टीका व वल्गना करीत असतात. आम्ही येथे चुकीची कामे होऊ देत नाही. तसा प्रयत्न कुणी केला, तर बाहेरचा रस्ता दाखविला जातो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.
- अविनाश कोळी
सांगली - संपूर्ण राज्यात जिल्हा बँकेचे काम आदर्शवत सुरू आहे. विरोधक राजकारण म्हणून बँकेविषयी टीका व वल्गना करीत असतात. आम्ही येथे चुकीची कामे होऊ देत नाही. तसा प्रयत्न कुणी केला, तर बाहेरचा रस्ता दाखविला जातो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिराळा विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष जयश्री पाटील, चिमण डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयंत पाटील म्हणाले की, मध्यवर्ती बँकांचे कामकाज नियम व कायद्यातून चालवले पाहिजे. या बँकांचा उपयोग रेटारेटी, तसेच राजकारणावर प्रभाव पाडण्यासाठी होता कामा नये. सांगली जिल्हा बँकेने केलेली प्रगती आदर्शवत असून अभिमान वाटावी असे आहे. जिल्हा बँक ही सामान्यांच्या विकासाचे साधन असल्याने ती चांगल्या रीतीने चालवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शिराळा येथील इमारत म्हणजे बँकेचे अस्तित्व किती प्रभावी आहे, हे दाखविणारी आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक प्रगतिपथावर आहे. ठेवीमध्ये मोठ्या वाढीबरोबर बऱ्याच वर्षांनी या बँकेचा एनपीए एकच्या आत आला आहे.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, ही बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. फक्त बँकेचा फायदा न पाहता शेतकऱ्यांना आर्थिक ताकद देण्याचे काम, तसेच त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. सांगली जिल्हा बँक राज्यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. संचालक मंडळ, शेतकरी, सभासद, कर्मचारी यांच्या चांगल्या कामामुळे दोन वर्षांत एक हजार कोटी रुपयांच्या ठेवीत वाढ झाली आहे, असे सांगितले.
यावेळी महेंद्र लाड, संग्रामसिंह देशमुख, वैभव शिंदे, अनिता सगरे, बाळासाहेब पाटील, वैभव शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, बी.एस. पाटील, पृथ्वीराज पाटील, अनिता सगरे, दत्तात्रय पाटील, विजय पाटील, विश्वास पाटील, बाळासाहेब नायकवडी, संभाजी गायकवाड, तानाजी पाटील, सुरेश पाटील, सरव्यवस्थापक सतीश सावंत, मोहीत चौगुले, संजय खराडे उपस्थित होते. सरव्यवस्थापक सुधीर काटे यांनी आभार मानले.
म्हणूनच बँकेवर विश्वास : विश्वजीत कदम
विश्वजीत कदम म्हणाले, बँक ही कोणत्या पक्षाची नसावी. शेतकरी सभासदांची असावी. असे पक्षविरहित काम पाहूनच या बँकेवर शेतकरी, सभासदांनी विश्वास दाखवून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. आर्थिक संस्था चालविताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मोठी कर्जे देताना काळजी घेणे आवश्यक आहे.