Sangli: गुंतवणुकदारांना फसवून सहा संचालक दुबईला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 11:37 AM2023-04-18T11:37:41+5:302023-04-18T11:37:57+5:30
Sangli: गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्स कंपनीचे सहा संचालक देश सोडून दुबईला पळाल्याची माहिती समोर आली आहे.
विटा (जि. सांगली): गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्स कंपनीचे सहा संचालक देश सोडून दुबईला पळाल्याची माहिती समोर आली आहे. या संचालकांनी गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये देशाबाहेर पाठवल्याचा अंदाज ए. एस. ट्रेडर्स विरोधी कृती समितीने व्यक्त केला आहे. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत.
कमी कालावधित जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाल्यापासून ए. एस. ट्रेडर्स कंपनीचे संचालक आणि एजंट परागंदा झाले आहेत. पाच महिन्यांत २७ पैकी केवळ एका संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला असून, अन्य संचालक अटक टाळण्यासाठी न्यायालयात हेलपाटे घालत आहेत. यातील प्रमुख सहा संचालक सध्या दुबईत असल्याची माहिती कंपनीच्या काही संचालकांनीच ऑनलाइन बैठकीत दिली. तसेच प्रमुख संचालकांनी कंपनीचे कोट्यवधी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय ए. एस. विरोधी कृती समितीने व्यक्त केला आहे.
तक्रारी देण्यासाठी रीघ लागली
ए. एस. ट्रेडर्सच्या गुंतवणूकदारांचे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. यातील बहुतांश ग्रुपवर सध्या कंपनीच्या विरोधातील नाराजी तीव्र झाली आहे. यातून तक्रारदारांची संख्या वाढत असून, सोमवारी ५०हून अधिक गुंतवणूकदारांनी तक्रारी देण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत गर्दी केली.