सांगली :माधवनगरला एसटीचे वर्कशॉप, बसस्थानक, एसटी प्रशासनाकडून मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:56 AM2019-01-03T11:56:19+5:302019-01-03T11:58:22+5:30
माधवनगर (ता. मिरज) येथे एसटी महामंडळाची दहा एकर मोकळी जागा असून, याठिकाणी सांगली आगाराचा वर्कशॉप विभाग आणि छोटे बसस्थानक करण्यास सात कोटींचा निधी मंजूर झाला आहे. एसटी महामंडळाकडून येत्या महिन्याभरात कामाची निविदाही निघणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथे एसटी महामंडळाची दहा एकर मोकळी जागा असून, याठिकाणी सांगली आगाराचा वर्कशॉप विभाग आणि छोटे बसस्थानक करण्यास सात कोटींचा निधी मंजूर झाला आहे. एसटी महामंडळाकडून येत्या महिन्याभरात कामाची निविदाही निघणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सांगलीचे मध्यवर्ती एसटी बसस्थानक १९६३ पासून अस्तित्वात आहे. सहा एकर जागा असून, यामध्ये शहरी आणि लांब पल्ल्याच्या एसटींची वाहतूक येथून होते. याशिवाय कार्यशाळा, एसटी बॅँकेसह विविध कार्यालये या जागेमध्ये आहेत. या बसस्थानकावर बसेस आणि प्रवाशांची गर्दी होत असल्यामुळे येथील वर्कशॉप विभाग माधवनगर येथील जागेत हालविण्याची मागणी ज्येष्ठ कामगार नेते बिराज साळुंखे यांनी गेल्या वीस वर्षांपासून एसटी महामंडळाकडे केली होती.
यासाठी अनेक आंदोलनेही त्यांनी केली होती. एसटी महामंडळाची माधवनगर जकात नाक्याजवळील जागा अत्यंत मोक्याची असल्यामुळे या जागेवर अनेकांचा डोळा होता. हे ओळखून बिराज साळुंखे यांनी माधवनगर एसटी बसस्थानक व डेपो कृती समिती गठित करून शासन दरबारी लढा दिला होता.
आज बिराज साळुंखे हयात नाहीत, पण त्यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. म्हणूनच एसटी महामंडळाने माधवनगर येथे सांगलीतील वर्कशॉप विभाग हलविण्यास मंजुरी दिली आहे.
माधवनगरच्या जागेत वर्कशॉप विभागासह लहान बसस्थानकही बांधण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी सात कोटींची तरतूद महामंडळाने केली आहे. या कामाची येत्या महिन्याभरात निविदाही महामंडळ काढणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी सांगितले.