सांगली : रेवणगाव घाटात एसटी-डंपरचा भीषण अपघात, तीन ठार, १२ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 03:38 PM2018-04-24T15:38:38+5:302018-04-24T15:38:38+5:30
विटा येथून आटपाडीकडे जाणार्या एसटी बसला समोरून येणार्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह ३ प्रवासी जागीच ठार झाले. यावेळी डंपर चालकासह १२ जण जखमी झाले.
विटा : विटा येथून आटपाडीकडे जाणार्या एसटी बसला समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह ३ प्रवासी जागीच ठार झाले. यावेळी डंपर चालकासह १२ जण जखमी झाले.
विजय जालिंदर कुंभार (वय ४६, रा. खानापूर, जि. सांगली), तानाजी विलास जाधव (वय ४५, रा. भडकेवडी), सुनंदा उत्तम यादव (वय ४६, रा. वाटूंबरे, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अपघातात ठार झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. हा अपघात आज (मंगळवार) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विटा शहरापासून १२ किमी अंतरावर रेणावी घाटात झाला.
आटपाडी आगाराची कऱ्हाड ते आटपाडी बस (एमएच १२ सी. एच. ७६७०) ४० प्रवासी घेऊन विटा मार्गे आटपाडीला निघाली होती. रेवणगाव घाटात एका वळणावर खानापूरहून विटा येथे येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटल्याने डंपर बसवर आदळला.
हा अपघात इतका भीषण होता की बस चालकाच्या पाठीमागील बसचा अर्ध्या भाग तुटून गेला. यावेळी खिडकीच्या बाजूला बसलेल्या तीन आसनावरील विजय कुंभार, तानाजी जाधव व सुनंदा यादव हे तीन प्रवासी जागीच ठार झाले.
या अपघातानंतर डंपर रस्त्यावर उलटला. या अपघातात डंपर चालकासह सत्वशीला ढाणे, श्रीदत्त ढाणे, सई ढाणे यांच्यासह १२ जण जखमी झाले. जखमींवर विटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.