Sangli- एसटी कर्मचाऱ्याचे आत्महत्या प्रकरण: जाच अधिकाऱ्यांकडून अन् शिक्षा दोन निष्पाप चिमुकलींना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 06:04 PM2024-10-15T18:04:51+5:302024-10-15T18:05:16+5:30

कारवाईबाबत कुटुंबीयांचा प्रश्न

Sangli ST employee suicide case: Investigation by authorities and punishment for two innocent minors | Sangli- एसटी कर्मचाऱ्याचे आत्महत्या प्रकरण: जाच अधिकाऱ्यांकडून अन् शिक्षा दोन निष्पाप चिमुकलींना

Sangli- एसटी कर्मचाऱ्याचे आत्महत्या प्रकरण: जाच अधिकाऱ्यांकडून अन् शिक्षा दोन निष्पाप चिमुकलींना

नितीन पाटील

पलूस : अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पलूस एसटी आगारातील एका वाहकाने आत्महत्या केल्याने कर्मचारी वर्ग सुन्न झाला आहे. ठराविक अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार अन् त्यांच्याकडून होणारा छळ यामुळे सातत्याने लालपरी बदनाम होत आहे. छळ अधिकाऱ्यांनी केला, मात्र त्याची शिक्षा मृत दुशांत यांच्या दोन चिमुकल्या मुलींना भोगावी लागणार आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही कहाणी पाहून एसटी महामंडळाचे आतातरी डोळे उघडणार की पुन्हा अशाच कहाण्या जन्माला येणार, असा अस्वस्थ सवाल कर्मचारी उपस्थित करीत आहेत.

हजारो प्रवाशांच्या आयुष्याचे दोर ज्यांच्या हाती असतात त्या कर्मचाऱ्यांचे दोर मात्र अधिकाऱ्यांच्या हाती आहेत. ते व्यवस्थित हाताळले गेले नाहीत, तर आयुष्याचे दोर तुटू शकतात, हे कटू वास्तव या घटनेने अधोरेखित केले आहे. कधी आत्महत्या, कधी आत्महत्येचा इशारा, कधी तणावात होणारे अपघात अशा गोष्टींचे ग्रहण एसटी कर्मचाऱ्यांना लागले आहे. पलूससारख्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

कवठेमहांकाळ आगारात जावेद नगारजी या कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या छळास कंटाळून आगारातच विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. राज्यभरातही अशीच स्थिती असली तरी सांगली जिल्ह्यात वारंवार छळाच्या तक्रारी समोर येत असल्याने एसटीचे अंतर्गत वातावरण तणावपूर्ण बनल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत.

पलूसमधील हा कर्मचारी मूळचा पुणे जिल्ह्यातील आहे. त्याच्या आत्महत्येने त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कवठेमहांकाळची घटना ताजी असताना पलूस आगाराचे वाहक दुशांत गंगाराम बुळे यांच्याबाबतीतही अशीच घटना घडली.

कारवाईबाबत कुटुंबीयांचा प्रश्न

तिकीट तपास अधिकारी हणमंत खरमाटे यांनी कारवाई केल्याने नैराश्यात असलेल्या दुशांत यांनी आत्महत्या केली. या अधिकाऱ्यांसोबत आणखी एक अधिकारी व एक चालक सोबत होते. तेसुद्धा ही कारवाई पाहात होते. या दोघांनी सहकारी अधिकाऱ्यास चुकीची कारवाई होताना का थांबविले नाही, असा सवाल मृत दुशांत यांचे कुटुंबीय करत आहेत.

दोन मुलींचे छत्र हरपले

दुशांत यांची पत्नी वर्षा यांचे दीर्घ आजाराने वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे दुशांत यांच्यावर त्यांच्या दोन मुलींची जबाबदारी होती. मोठी मुलगी सात वर्षाची तर लहान मुलगी दोन वर्षाची आहे. आता या दोन्ही चिमुकल्या मुलींच्या डोईवरचे माता-पित्यांचे छत्र पूर्णपणे हरविले आहे. एका छळाने अवघे कुटुंब उद्ध्वस्त झाले.

चिठ्ठीत अधिकाऱ्याने अपशब्द वापरल्याचा उल्लेख असल्याने पोलिसांकडून केवळ एकाच अधिकाऱ्यावर कारवाई केली जात आहे. एसटीने मात्र, तिघांवर कारवाई केली. कारवाईत ही तफावत का? योग्य तपास करून इतर दोघांवर गुन्हा दाखल करावा व माझ्या मृत भावाला न्याय द्यावा. -जालिंदर बुळे, मृताचा लहान भाऊ
 

अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी गेला. खरमाटे यांनी चौकशी करून कारवाई करायला हवी होती. दुशांतची मशीन तपासून मग कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती. पोलिसांनी योग्य तपास करून बुळे कुटुंबाला न्याय द्यावा. -मनोज पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा एसटी कामगार संघटना

Web Title: Sangli ST employee suicide case: Investigation by authorities and punishment for two innocent minors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली