वसंतदादांनंतर सांगलीची अवस्था बकाल:रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:14 PM2018-07-24T23:14:31+5:302018-07-24T23:15:01+5:30
सांगली : कधीकाळी सांगलीत भाजपला निवडणुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध करावी लागत होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जनतेने उखडून फेकला असून, दोन्ही पक्षांवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. महापालिकेची सत्ता वाटून खाण्यासाठी भाजपविरोधात सर्व एकत्र आले आहेत. वसंतदादांनंतर सांगलीची अवस्था बकाल केल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी केली.
येथील भावे नाट्यगृहात भाजप बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दानवे बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खा. संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, नीता केळकर, दीपक शिंदे-म्हैसाळकर उपस्थित होते.
दानवे म्हणाले की, सांगली हा वसंतदादांचा जिल्हा आहे. दादांनी सहकार, शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम केले. पण त्यांच्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांनी सांगलीची अवस्था बकाल केली. त्यामुळेच आता जिल्ह्याचे चित्र बदलले आहे. दोन्ही काँग्रेसचा वटवृक्ष उन्मळून पडला आहे. सांगलीकरांना शुद्ध पाणी मिळत नाही. अनेक सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. देशाची, राज्याची हवा कोणत्या दिशेने जाणार, हे महापालिकेच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. महापालिकेची सत्ता वाटून खाण्यासाठी, तसेच भांडण नको, म्हणून दोन्ही काँग्रेस एकत्र आल्याची टीकाही त्यांनी केली.
राज्यात, देशात जाती-जातीत तणाव निर्माण करून सत्ता मिळविण्याचा काँग्रेसचा डाव आहे. दलित-सवर्णांत भांडणे लावली जात आहेत. दलितांचा सर्वात मोठा शत्रू काँग्रेस आहे. याच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोनदा लोकसभेत जाण्यापासून रोखले होते. भंडारा व दादर मतदारसंघात त्यांचा पराभव केला होता. आज राज्यातील १३ महापालिका, १० जिल्हा परिषदा, ८० नगरपरिषदा व पाच हजार सरपंच भाजपचे आहेत. राज्यात भाजपच एक नंबरचा पक्ष असून सांगलीतही भाजपचाच झेंडा फडकेल, असा दावा त्यांनी केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपमधील नाराजांनी नाराजी झटकून पक्षकार्यात सक्रिय व्हावे. भाजप हा विशाल पक्ष आहे. एका ठिकाणी संधी मिळाली नाही, तर दुसऱ्या ठिकाणी मिळते. सांगलीत चांगले नगरसेवक निवडून आले तर शहराचा विकास होईल.
सुभाष देशमुख म्हणाले की, महापालिकेच्या सत्तेचा वापर करून काँग्रेस नेत्यांनी स्वत:ची पोळी भाजली आहे. भाजपला सत्ता मिळाल्यास पाच वर्षांत सांगलीचे चित्र बदलू. उमेदवारांच्या पदयात्रा नुसत्या चांगल्या होऊन चालणार नाही, तर त्यांचे मतात रूपांतर होण्यासाठी कष्ट घ्या. बोगस मतदान रोखण्याची जबाबदारी बुथ कार्यकर्त्यांची आहे. या निवडणुकीत भाजप ६० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वीच्या आमदारांनी : काय केले?
सांगली, मिरजेतील भाजपच्या आमदारांनी ५८ कोटींचा निधी आणला. यापूर्वीच्या आमदारांनी सांगलीसाठी किती निधी आणला? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला. राज्याची, देशाची तिजोरी भाजपच्या हाती आहे. त्याला कमळाची चावी लागते, घड्याळाची चावी बसत नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला.
एका व्यासपीठावर या
भाजपला थापा मारणारे सरकार म्हणून हिणवले जात असल्याचा उल्लेख करीत दानवे म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकाच व्यासपीठावर यावे. त्यांनी ६८ वर्षांत काय केले व आम्ही चार वर्षांत काय केले, हे एकदा होऊनच जाऊन दे, असे आव्हान त्यांनी दिले.