सांगली : विद्यार्थ्यांनी छेडल्या तंतुवाद्यांच्या संशोधन तारा, मिरजेतील सफर : शिवाजी विद्यापीठाच्या उपक्रमाचा भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:00 PM2017-12-28T14:00:57+5:302017-12-28T14:07:45+5:30
पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती वाढीस लागावी म्हणून शिवाजी विद्यापीठाने सुरू केलेल्या अविष्कार संशोधन उपक्रमाअंतर्गत मिरजेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी तंतुवाद्यांच्या माहेरघराची सफर केली. वाद्यांच्या निर्मितीच्या संशोधन तारा छेडत या विद्यार्थ्यांनी या सफरीचा आनंद लुटला.
मिरज : पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती वाढीस लागावी म्हणून शिवाजी विद्यापीठाने सुरू केलेल्या अविष्कार संशोधन उपक्रमाअंतर्गत मिरजेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी तंतुवाद्यांच्या माहेरघराची सफर केली. वाद्यांच्या निर्मितीच्या संशोधन तारा छेडत या विद्यार्थ्यांनी या सफरीचा आनंद लुटला.
शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तंतुवाद्यनिर्मितीसाठी जगप्रसिध्द असणाऱ्या मिरजेतील तंतुवाद्यनिर्मिती केंद्रांना भेट देऊन वाद्यनिर्मितीचा इतिहास आणि सध्यस्थिती जाणून घेतली. इतिहास विभागाच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मिरज शहर हे तंतुवाद्यनिर्मितीसाठी प्रसिध्द आहे. तंतुवाद्यनिर्मितीचा इतिहास आणि निर्मितीप्रक्रीया विद्यार्थ्यांना समजावी, या हेतूने साळुंखे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अभ्याससहल येथे आयोजित करण्यात आली होती. प्राचार्य डॉ. उदयसिंह माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागप्रमुख डॉ. अर्चना जाधव यांनी या अभ्यास सहलीचे आयोजन केले.
मिरज शहरात १८५० साली ज्या ठिकाणी पहिले तंतुवाद्य तयार झाले, त्या भारतीय तंतुवाद्य केंद्र आणि सरस्वती तंतुवाद्य केंद्र या ठिकाणांना भेट देऊन विद्यार्थ्यांनी वाद्यनिर्मितीचा इतिहास जाणून घेतला. तंबोरा, सतार, सारंगी, दिलरूबा,रूद्रवीणा, ताऊस अशी वाद्ये विद्यार्थ्यांनी यावेळी पाहिली.
या वाद्यांमधील फरक समजावून घेतला. मजीद सतारमेकर,अलताफ सतारमेकर, आतीक सतारमेकर यांनी ही वाद्ये कशी तयार करतात, याचे प्रात्यक्षीक करून दाखवले. कोणतीही यांत्रीक साधने न वापरता केवळ हस्तकौशल्याच्या जोरावर ही वाद्ये तयार होत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
फरीदसाहेब सतारमेकर यांनी १८५० साली प्रतिकूल परिस्थितीमधून कशा पध्दतीने वाद्य तयार केले?, वाद्यासाठी लागणारे विशिष्ट प्रकारचे भोपळे कुठून मागवले जातात?, यांसह अन्य प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
तंतुवाद्य कारागीरांच्या सध्याच्या समस्या काय आहेत, त्यांना शासनाकडून काही सहाय्य होते का? याचीही माहिती यावेळी घेण्यात आली. या अभ्यास सहलीतून तंतुवाद्यनिर्मितीचा दीडशे वर्षांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडला.