Gudhi padwa 2018 सांगली : अशा तयार होतात साखरमाळा, यंदा अधिकच्या मागणीमुळे दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:59 PM2018-03-15T13:59:23+5:302018-03-15T13:59:58+5:30
गुढी पाडवा आणि साखरेच्या माळांचे दृढ नाते आधुनिक युगातही त्यातील धाग्यांइतकेच मजबुत आहे. याच साखरमाळांच्या उत्पादकांना यंदा अधिकच्या मागणीमुळे दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे साखरेचे दर गतवर्षापेक्षा कमी झाल्यानेही माळांच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही.
सांगली : गुढी पाडवा आणि साखरेच्या माळांचे दृढ नाते आधुनिक युगातही त्यातील धाग्यांइतकेच मजबुत आहे. याच साखरमाळांच्या उत्पादकांना यंदा अधिकच्या मागणीमुळे दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे साखरेचे दर गतवर्षापेक्षा कमी झाल्यानेही माळांच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही.
साखरमाळांच्या गोडव्याशिवाय मराठी नववर्षाची गुढी उभारली जात नाही. गेल्या कित्येक वर्षांची ही परंपरा आजही अबाधित आहे. सांगलीच्या खणभाग तिवारी गल्लीतील जाधव बंधुंची साखरमाळा उत्पादनाची जवळपास ९0 वर्षाहून अधिक काळाची परंपरा आहे. सांगलीत असे काही मोजकेच परंपरागत साखरमाळा उत्पादक आहेत.
महाशिवरात्री संपली की लगेच दोन दिवसांनी साखरमाळा उत्पादनास सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी हे काम संपते. यंदा बाजारात साखरमाळांना मोठी मागणी आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे. साखरमाळांचे सध्याचे दर किलोला ८0 ते १२0 रुपये किलो असा आहे. मोठ्या माळांचा दर १00 ते २00 रुपये इतका आहे.
होलसेल बाजारात सध्या साखरमाळांचा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याची माहिती येथील उत्पादक सरस्वती जाधव यांनी दिली. एका घरात आता तीन ते चार साखरमाळा लागतात. एक गुढीला, एक देव्हाऱ्यात आणि एक कुलदैवताला किंवा ग्रामदैवताला दिली जाते. सांगलीच्या बाजारात गेली आठवडाभर साखरमाळा दाखल झाल्या आहेत.
अशा तयार होतात साखरमाळा
सुरुवातीला साखर स्वच्छ केली जाते. त्यासाठी दुधाचाही वापर केला जातो. शुद्ध स्वरुपातील साखरेचा पाक तयार करून त्यात खायचा नैसर्गिक रंग वापरला जातो. हा पाक गरम करून तो साच्यांमध्ये एका पळीद्वारे पद्धतशीरपणे ओतला जातो.
साच्यांमध्ये दोऱ्या अगोदरच घातल्या जातात. त्यानंतर पाच ते सहा साचे एकत्रीत बांधले जातात. पाण्याचा वापर करून ते सुखवले जातात. साचे उघडून त्यातील दोऱ्यांच्या सहाय्याने साखरमाळा अलगद काढून त्या टांगल्या जातात.
साखरेपेक्षा शुद्ध असतात साखरमाळा
साखरेचे पुन्हा शुद्धिकरण करण्याची प्रक्रिया माळा तयार करताना होते. पुन्हा ते गरम केले जाते. त्यामुळे जेव्हा साखरेपेक्षाही शुद्ध स्वरुप या माळांना प्राप्त होत असते. बऱ्याचदा घरात शिल्लक राहिलेल्या माळांचा चहासाठीही उपयोग केला जातो.
तासाला तीनशे माळा
साखरमाळा अत्यंत गतीने तयार केल्या जातात. एका तासात जवळपास ३00 माळा तयार होतात. दिवसभरातील आठ तास साखरमाळांच्या उत्पादनाचे काम चालते. म्हणजेच दिवसभरात अडिच हजार माळा तयार होतात.