सांगली : मौजे डिग्रजच्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा, नुकसान भरपाई प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:24 PM2018-03-24T15:24:02+5:302018-03-24T15:24:02+5:30
पूरसंरक्षण भिंतीसाठी शेतजमिनींचे अधिग्रहण करूनही नुकसान भरपाई न दिल्याने मौजे डिग्रज येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिला आहे. याप्रश्नी पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
सांगली : पूरसंरक्षण भिंतीसाठी शेतजमिनींचे अधिग्रहण करूनही नुकसान भरपाई न दिल्याने मौजे डिग्रज येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिला आहे. याप्रश्नी पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुनील फराटे, मौजे डिग्रज येथील शेतकरी अशोक रामू तोडकर, बाळासो यशवंत पाटील यांनी याप्रश्नी एक निवेदन तयार करून ते जलसंपदा मंत्र्यांना पाठविले आहे. फराटे यांनी सांगितले की, तोडकर यांची ८८ गुंठे आणि पाटील यांची १५ गुंठे जमिन पूरसंरक्षक भिंतीसाठी घेतली आहे. याठिकाणी भिंत उभारण्यातही आली आहे.
भूमी संपादनाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडता शेतकऱ्यांच्या जमिनीवर पूरसंरक्षक भिंत उभारण्यात आली. त्यासाठी शासकीय निधी खर्चही करण्यात आला.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी असंख्य वेळा पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता नामदेव करे यांना समक्ष भेटून नुकसानभरपाईची मागणी केली. या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली.
या जमिनींबाबतचा प्रस्ताव दोनवेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. जिल्हाधिकाऱ्यांनीही नवीन भूसंपादन कायद्यानुसार प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते, मात्र आज अखेर हा प्रस्ताव धुळ खात पडून आहे.
याप्रश्नी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांनी आत्मदहनाची मानसिकता व्यक्त केली आहे. असा प्रकार घडल्यास त्यास संबंधित यंत्रणा जबाबदार राहिल, असा इशारा त्यांनी दिला आहे.