सांगली : उत्पादन शुल्कचे चौगुले निलंबित, क्रांतीवरील कारवाई : माहिती देऊनही प्रकरण अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:19 PM2018-06-08T13:19:05+5:302018-06-08T13:19:05+5:30
कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी प्रकल्पावर कारवाई करण्यास विलंब केल्याचे कारण दाखवून राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली विभागाचे तत्कालीन निरीक्षक एस. डी. चौगुले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. वास्तविक चौगुले यांनीच कारखान्यावर कारवाई करण्याचे सुचविले होते. पण वरिष्ठांनी त्यांच्यावर कारवाईच्या माध्यमातून बळी दिला.
सांगली : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी प्रकल्पावर कारवाई करण्यास विलंब केल्याचे कारण दाखवून राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली विभागाचे तत्कालीन निरीक्षक एस. डी. चौगुले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. वास्तविक चौगुले यांनीच कारखान्यावर कारवाई करण्याचे सुचविले होते. पण वरिष्ठांनी त्यांच्यावर कारवाईच्या माध्यमातून बळी दिला.
चौगुले यांच्याकडे सांगली शहर विभागाचा कार्यभार होता. काही महिन्यापूर्वी विटा विभागाचा त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला होता. क्रांती कारखान्याच्या आसवाणी प्रकल्पाला त्यांनी भेट देऊन पाहणी केली होती. तशा कारखान्याकडे नोंदी आहेत. मे महिन्यात चौगुले यांची पुण्याला बदली झाली.
२१ मे रोजी त्यांनी सांगलीचा कार्यभार सोडला. त्यावेळी त्यांनी वरिष्ठांना क्रांती कारखान्याने बेकायदा स्पिरीटचे उत्पादन केल्याची माहिती दिली. त्यानंतर ते पुण्याला निघून गेले. चार दिवसानंतर सांगलीच्या पथकाने कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात १८ लाख लिटर स्पिरीट जप्त केले होते. याप्रकरणी प्रकल्पाच्या व्यवस्थापकाला अटक केली होती.
कुंडल कारखान्यावर झालेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. १८ लाखाचे स्पिरीचे उत्पादन होईपर्यंत अधिकाऱ्यांना याची खबर कशी लागली नाही, असा समज करुन वरिष्ठांनी कोणतीही चौकशी न करता चौगुले यांना दोषी धरुन तडकाफडकी निलंबित केले आहे.
वास्तविक चौगुले यांनीच कारखान्यातील बेकायदा स्पिरीट उत्पादनाची माहिती दिली होती. ही बाब सांगलीतील अधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी सांगितली नाही. आपल्यावर कारवाई होऊ नये, यासाठी काही अधिकाऱ्यांनी चौगुले यांना बळीचा बकरा बनविला असल्याची चर्चा सुरु आहे.
माहिती नाही : किर्ती शेडगे
यासंदर्भात सांगलीच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांच्याशी संपर्क साधून चौगुले यांच्यावर झालेल्या कारवाईची माहिती विचारली. पण त्यांनी मला काहीच माहिती नाही, असे सांगितले.