सांगली : जत तालुक्यात प्रेमीयुगुलाचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 02:51 PM2023-03-22T14:51:26+5:302023-03-22T14:52:27+5:30

दुहेरी आत्महत्येची चर्चा; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय

Sangli Suspicious death of lover in Jat taluka couple | सांगली : जत तालुक्यात प्रेमीयुगुलाचा संशयास्पद मृत्यू

सांगली : जत तालुक्यात प्रेमीयुगुलाचा संशयास्पद मृत्यू

googlenewsNext

जत (जि.सांगली) : रामपूर (ता.जत) येथील काेळेकर वस्तीवर मंगळवारी प्रेमीयुगुलाचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी संशयास्पद स्थितीत आढळून आले. उमेश उर्फ पिंटू अशोक कोळेकर (२३, सध्या रा.सांगली) व प्रियांका बाळासाहेब कोळेकर (२५, रा.रामपूर) अशी मृतांची नावे आहेत. उमेशचा मृतदेह वस्तीजवळील ओढ्याजवळ आढळून आला, तर प्रियांकाने घरी गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार वाटत असला, तरी दाेघांच्याही नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

रामपूर येथील कंठी रस्त्यावर कोळेकरवस्ती आहे. येथील उमेश काेळेकर सांगलीतील मार्केट यार्डात हमाली करीत हाेता. वस्तीवरील प्रियांकाशी त्याचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी काही वादातून प्रियांकाने त्याच्याविराेधात बलात्काराची तक्रार दिली हाेती. यानंतर, उमेशला अटक झाली हाेती. डिसेंबरमध्ये ताे तुरुंगातून बाहेर आला हाेता. यानंतर, ताे सांगलीतच राहत हाेता. साेमवारी रात्री ताे रामपूर येथे घरी आला. यानंतर, सकाळी त्याचा मृतदेह ओढापात्रात झाेपलेल्या स्थितीत आढळून आला. मृतदेहाजवळ चप्पल होती, तर बाजूला कीटकनाशकाची बाटलीही होती. मात्र, कीटकनाशक प्राशन केल्यानंतर हाेणाऱ्या त्रासाची काेणतीही चिन्हे घटनास्थळी अथवा मृतदेहावर नव्हती. यामुळे त्याचा खून करून आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. वस्तीवरील उमेशचे भाऊ व अन्य नातेवाइकांनी त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान, उमेशविराेधात बलात्काराची तक्रार देणाऱ्या प्रियांकाने साेमवारी पुन्हा जत पाेलिस ठाण्यात त्याच्याविराेधात तक्रार दिली हाेती. मात्र, मंगळवारी सकाळी उमेशचा मृतदेह दिसून आल्याने खळबळ उडाली. सकाळी अकरा वाजता त्याचा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

या दरम्यान, प्रियांकाचाही मृतदेह घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. उमेशच्या मृत्यूनंतर तिनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु नेमका तिचा मृत्यू कसा झाला, याची माहिती समोर येऊ शकली नाही. प्रियांकाच्या माहेरच्या नातेवाइकांनी तिच्या घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी नातेवाईक जत पोलिस ठाण्यात गेले. मात्र, पाेलिसांनी तक्रार न घेतल्याने ते सांगलीस पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांच्या भेटीसाठी गेले. त्यामुळे प्रियांकाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी थांबविण्यात आली.

Web Title: Sangli Suspicious death of lover in Jat taluka couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली