मिरज पॅटर्नविरुद्ध सांगलीकरांचा एल्गार
By Admin | Published: November 5, 2015 10:49 PM2015-11-05T22:49:22+5:302015-11-05T23:54:54+5:30
विकासासाठी एकत्र : वीस सर्वपक्षीय नगरसेवकांचा गट सरसावला
सांगली : महापालिकेतील मिरजकर नगरसेवकांचा वरचष्मा कमी करण्यासाठी सांगलीतील नगरसेवक सरसावले आहेत. सांगली व कुपवाडमधील वीस सर्वपक्षीय नगरसेवकांनी यापुढे विकास कामांसाठी दबावगट तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मिरज पॅटर्नच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधीचा निधी पळविणाऱ्यांना या गटाकडून शह दिला जाणार आहे. सध्या तरी ही चर्चा प्राथमिक पातळीवर असली तरी, तिला लवकरच मूर्त स्वरूप मिळेल, असे दिसते.
महापालिकेच्या स्थापनेपासून गेली सोळा वर्षे मिरजेतून निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी नेहमीच सत्ताधारी नेत्यांवर दबाव ठेवला होता. पालिकेत सत्ता कोणाचीही असो, मिरजकरांचीच चलती असायची. मग जयंत पाटील असो अथवा मदन पाटील असो, या नेत्यांना सत्तेची गणिते जुळविताना नेहमीच मिरजकरांना झुकते माप द्यावे लागले आहे. ‘मिरज पॅटर्न’ या गोंडस नावाखाली नगरसेवकांनी नेत्यांवर वरचष्मा गाजविला आहे. विकास कामाचा निधी जास्तीत जास्त मिरजेत खर्च व्हावा, यासाठी हे सदस्य आक्रमक असतात.
त्यातच पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते मदनभाऊ पाटील यांचे निधन झाल्याने, समीकरणेच बदलणार आहेत. पालिकेच्या कारभारात त्यांचा शब्द अंतिम होता. पण आता दबदबाच संपल्याने सांगलीकरांना कोण वाली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी विचारविनियम सुरू केला आहे. शहरातील विविध विकासकामे, शासकीय योजना मार्गी लावण्यासाठी प्रशासन व पदाधिकाऱ्यांवर दबाव असावा, असा सूर उमटत आहे. त्यासाठी सर्वपक्षीय वीस नगरसेवकांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षीय जोडे बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी यापुढे काम करण्याचा निर्धार केला जात आहे. या दबाव गटात सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीसह स्वाभिमानी आघाडीचे नगरसेवक आहेत. सध्या या दबाव गटाची निर्मिती चर्चेच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. लवकरच तिला मूर्त स्वरुप देण्याचा निर्धार केला आहे. त्यात त्यांना कितपत यश मिळते, हे भविष्यातच कळेल. (प्रतिनिधी)
धास्ती कायम : टिकाव लागणार का?
सांगली, कुपवाडच्या नगरसेवकांनी जरी एकत्रित गट केला तरी आजपर्यंतचा अनुभव पाहता ते पुन्हा मिरजकरांच्या अधिपत्याखाली जाऊ शकतात. त्यामागे अर्थपूर्ण तडजोडी हे प्रमुख कारण आहे. आतापर्यंत महापालिकेचा राजकारणात या घडामोडी घडल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आता सांगलीकरांनी बाह्या सरसावल्या असला तरी त्यांचा टिकाव लागणार का? ते किती काळ एकत्र राहणार, हाच खरा प्रश्न उपस्थित केला जात आहे.