सांगलीतील शिक्षकांचा दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन
By अशोक डोंबाळे | Published: February 27, 2023 04:57 PM2023-02-27T16:57:17+5:302023-02-27T16:59:19+5:30
दोन प्रमुख मागण्यांसाठीच दहावी आणि बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार
अशोक डोंबाळे
सांगली : माध्यमिक शाळांमध्ये २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी आणि सर्व शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार घातला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.
शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुधीर माने, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे आनंदराव पिसाळ, मुख्याध्यापक संघाचे अशोक जाधव, शिक्षकेतर संघटनेचे प्रवीण शिंदे आदींच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी आंदोलन केले. निवेदनात म्हटले की, माध्यमिक शाळांमध्ये २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही. परिणाम त्यांना सेवानिवृत्तीचे जीवन जगताना खूप अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
शासनाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच सर्व शाळांना पगार आणि इमारत देखभाल दुरुस्तीसाठी १०० टक्के अनुदान मिळाले पाहिजे. या प्रमुख दोन मागण्यांसाठीच दहावी आणि बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर आम्ही बहिष्कार घालणार आहे, असा इशाराही शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुधीर माने यांनी दिला आहे.