सांगली : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनमध्ये कोणताही बदल करता येत नाही : काळम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 06:09 PM2018-11-02T18:09:53+5:302018-11-02T18:11:33+5:30
मतदान केंद्रावर येण्यापूर्वी ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीन विविध स्तरांवर तपासली जाते. तसेच, ज्या ठिकाणी या मशिन्स ठेवल्या जातात, त्या ठिकाणी 24 तास सीसीटीव्ही आणि पोलीस पहारा असतो. त्यामुळे या मशिन्समध्ये कोणताही फेरफार किंवा बदल करता येत नाही. त्यामुळे समाजमाध्यमांमध्ये याबाबतच्या येणाऱ्या संदेशातील अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी आज केले.
सांगली : मतदान केंद्रावर येण्यापूर्वी ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीन विविध स्तरांवर तपासली जाते. तसेच, ज्या ठिकाणी या मशिन्स ठेवल्या जातात, त्या ठिकाणी 24 तास सीसीटीव्ही आणि पोलीस पहारा असतो. त्यामुळे या मशिन्समध्ये कोणताही फेरफार किंवा बदल करता येत नाही. त्यामुळे समाजमाध्यमांमध्ये याबाबतच्या येणाऱ्या संदेशातील अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी आज केले.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका या ईव्हीएम पद्धतीनेच होणार असून, या प्रक्रियेबद्दल लोकांमधील वेळोवेळी होणाऱ्या टीका-टिपण्णीतून निर्माण झालेला संभ्रम दूर व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक यंत्रणेतील अन्य अधिकारी-कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, मतदार यांच्या उपस्थितीत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन अभिरुप मतदान (मॉक पोल) घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मतदान प्रक्रियेतील ईव्हीएम मशीन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन सील केल्यानंतर कोणतीही कमांड देऊन त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. हे मशिन्स ज्या ठिकाणी ठेवली जातात, त्या ठिकाणी 24 तास पोलीस पहारा असतो. तसेच, त्या ठिकाणी पूर्व परवानगीशिवाय आणि नोंद वहीत नोंद केल्याशिवाय प्रवेश करता येत नाही. त्यामध्ये चिप बसवता येत नाही. त्यामुळे समाज माध्यमांमध्ये येणारे संदेश दिशाभूल करणारे असतात, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे व अशा फसव्या संदेशांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन त्यानी यावेळी केले.
यावेळी प्रात्यक्षिकांद्वारे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन व मतदान प्रक्रियेबाबत भारत हेव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) च्या तज्ज्ञांनी उपस्थितांना इत्यंभूत माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पत्रकार यांनी अभिरुप मतदान (मॉक पोल) केले. तसेच, मशीनमध्ये केलेले मतदान त्याच व्यक्तीला होते, व मतमोजणीही मतदानाप्रमाणे होते, याबाबत उपस्थितांनी खात्री करून घेतली, शंकांचे निरसन करून घेतले.
एका सेटमध्ये एक व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट असते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 ऑक्टोबरपासून प्रथमस्तरीय तपासणी सुरु होती. याचा अंतिम टप्पा अभिरुप मतदान आहे. यामध्ये 5 टक्के मशीनचे मॉक पोल करण्यात आले. यामध्ये 1 टक्के मशीनवर 1200 मॉक पोल, 2 टक्के मशीनवर 1000 मॉक पोल आणि 2 टक्के मशीनवर 500 मॉक पोल घेण्यात आले. यासाठी 100 कर्मचारी कार्यरत होते. अभिरुप मतदान झाल्यामुळे ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीन प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनाज मुल्ला यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, कर्मचारी उपस्थित होते.