सांगली : जमीन अधिग्रहणाविरोधात महसूलमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 03:03 PM2018-12-08T15:03:06+5:302018-12-08T15:06:48+5:30
रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गासाठी जमिनी अधिग्रहीत करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता जमिन अधिग्रहीत केल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
सांगली : रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गासाठी जमिनी अधिग्रहीत करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता जमिन अधिग्रहीत केल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सांगली ते कोल्हापूर शेतकरी दिंडीने जात मंगळवार दि. ११ पासून कोल्हापूरातील महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
देशमुख म्हणाले, रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण सुरू आहे. अधिग्रहण करत असताना शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार केलेला नाही. प्रशासनाने प्रसिध्दीमाध्यमातून जमीन अधिग्रहण केल्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यावर कार्यवाही झालेली नाही.
यासह देवस्थान इनाम वर्ग ३ची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचेही काही प्रश्न प्रलंबीत आहेत. या दोन्ही प्रश्नावर सोमवार दि. १० डिसेंबर रोजी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून पायी दिंडीस प्रारंभ होणार आहे.
रात्री अतिग्रे येथे मुक्काम करून ११ डिसेंबर रोजी दिंडी कोल्हापूरात पोहचून महसूल मंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार भूमीअधिग्रहण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, सांगली-कोल्हापूर राज्यमार्गाचे अधिग्रहण झाल्याशिवाय राष्ट्रीय महामार्गाचे अधिग्रहण करू नये, अधिग्रहीत जमिनीवरील घरे, झाडे, विहिरी, बोअरवेल्स या सर्वांची बाजारभावाच्या पाचपटीने मोबदला देण्यात यावा, शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून जाहीर करावे, महामार्गाचा झालेला चूकीचा सर्व्हे मान्य नसल्याने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व्हे करावा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी दिगंबर कांबळे, गुलाब मुलाणी यांच्यासह किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
देवस्थान इनाम जमिनींचेही प्रश्न
देवस्थान इनाम वर्ग ३ ची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासून समस्या कायम आहेत. ही जमीन कसणाऱ्यांच्या नावावर झाली पाहिजे या मागणीसह इतर प्रश्नांची सोडवणूक करावी अशीही मागणी करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.